News Flash

पवारांमुळे मनोहर जोशी मुख्यमंत्री

युतीची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निर्माण झाल्यावर बाळासाहेबांनी शरद पवारांचा सल्ला ऐकला.

 मनोहर जोशी व शरद पवार

‘आधारवड’मध्ये दावा; ‘हुकलेल्या पंतप्रधानपदाचे’ ही विश्लेषण

१९९५ मध्ये पहिल्यांदा शिवसेना-भाजपची सत्ता आली तेव्हा सुधीर जोशी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित झाले होते, पण मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री करावे, असा सल्ला शरद पवार यांनी तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला आणि मनोहरपंत मुख्यमंत्री झाले, असा खळबळजनक दावा पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘आधारवड’ या पुस्तकात करण्यात आला आहे.

मराठी, इंग्रजीसह पाच भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पुस्तकात पवारांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेण्यात आला आहे. अजित पवार, सुनील तटकरे, हेमंत टकले, निरंजन डावखरे, प्रसाद लाड आणि आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.

मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रीपदावरून नेहमीच चर्चा सुरू असते. राष्ट्रवादीच्या पुस्तकात ‘पवारांच्या जीवनातील ५५ वर्षांतील महत्त्वाची घटना’ या प्रकरणात मनोहरपंतांच्या मुख्यमंत्रीपदावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने पवारांवर टीका केली होती. विशेष म्हणजे बाळासाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री पवारांना लक्ष्य केले होते. युतीची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निर्माण झाल्यावर बाळासाहेबांनी शरद पवारांचा सल्ला ऐकला. यावरून तेव्हाच्या राजकीय वर्तुळात पवारांचे महत्त्व वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

शरद पवार यांना पंतप्रधानपदाची दुसरी संधी १९९६ मध्ये नरसिंहराव यांच्यामुळे गेली. भाजपचे सरकार १३ दिवसांमध्ये गडगडल्यावर समविचारी पक्षांची मोट बांधून सरकार स्थापण्याकरिता पवारांनी पुढाकार घेतला होता. पक्षाने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असता तर पवार नक्कीच पंतप्रधान झाले असते, पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष नरसिंहराव यांनी अल्पमताच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यातून पवारांची संधी हुकली, असा दावा करण्यात आला आहे.

..तर दंगली,  गुप्तचर विभागाचा इशारा

सोनिया गांधी यांच्या विदेशीचा मुद्दा उपस्थित केल्यानेच शरद पवार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली, परंतु २००४च्या निवडणुकीत पवारांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. २००४ मध्ये भाजपच्या विरोधात निधर्मवादी पक्षांना जास्त जागा मिळाल्या. तेव्हा पंतप्रधानपदाचा मुद्दा पुढे आला होता. सोनियांनी पंतप्रधानपद स्वीकारावे, अशी मागणी केली जात होती, पण सोनिया पंतप्रधान झाल्यास विदेशीचा मुद्दा पुन्हा उफाळून येईल आणि देशात हिंसक संघर्ष होईल, असा इशारा गुप्तचर विभागाने दिला होता, असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.

सोनिया आणि नरसिंह राव जबाबदार 

पवारांची पंतप्रधानपदाची संधी दोनदा हुकल्याचा दावाही करण्यात आला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पवारांना पंतप्रधानपदाची पहिल्यांदा संधी आली होती, पण सोनिया गांधी यांनी नरसिंहराव यांचे उपद्रवमूल्य फारसे नसल्यानेच त्यांना पसंती दिली. वास्तविक काँग्रेस अध्यक्षपद आणि पंतप्रधानपद वेगवेगळ्या नेत्यांकडे असावे, अशी भूमिका पवार यांनी मांडली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2016 3:14 am

Web Title: manohar joshi is getting cm post just because sharad pawar
Next Stories
1 गुजरातच्या सौरपंप खरेदीचा फेरअभ्यास करण्याचे निर्देश
2 रिक्त जागा पदोन्नतीने भरणार
3 … अखेर वरळी सी लिंक येथे अद्ययावत पोलीस चौकी
Just Now!
X