तीन बँकांची ६८ कोटी रुपयांची कर्ज थकबाकी

तीन सरकारी बँकांचे ६८ कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवल्याने लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसेनानेते मनोहर जोशी यांचे विकासक असलेले चिरंजीव उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांची कुर्ला आणि लोणावळ्याची मालमत्ता जप्त केली आहे.

कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टने बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ही कर्जे घेतली होती. त्यासाठी उन्मेष जोशी, माधवी उन्मेष जोशी, अनघा मनोहर जोशी आणि कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शन हे त्यासाठी हमीदार होते. ट्रस्टने कर्जे न फेडल्याने मालमत्तेवर जप्ती आणण्याची कारवाई बँकांनी जानेवारी आणि मे २०१७ पासून सुरू केली होती. कर्जदार व हमीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही ही कर्जे फेडण्यास ते असमर्थ ठरल्याने वित्तीय मत्तेची सुरक्षितता आणि सुरक्षा हित अंमलबजावणी नियम, २००२ मधील तरतुदींनुसार मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे, असे बँक ऑफ महाराष्ट्रच्या उप मुख्य व्यवस्थापकांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या संदर्भात उन्मेष जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोबाईल दूरध्वनीला आणि लघुसंदेळालाही प्रतिसाद दिला नाही. मनोहर जोशी यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.

या बँकांची कर्जे

कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टने बँक ऑफ महाराष्ट्रचे १२ कोटी ७९ लाख आणि अन्य तीन कोटी तीन लाख रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३८ कोटी ६३ लाख रुपये, बँक ऑफ इंडियाचे १३ कोटी १८ लाख रुपये थकविले आहेत, अशी माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली. या बँकांनी मालमत्ता जप्तीसंदर्भात जाहिरातही प्रसिद्ध केली होती.