गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी आहे अशी धक्कादायक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांन दिली आहे. गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. पण हे वास्तव आहे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. राफेलची बोलणी सुरु झाल्यानंतर पर्रिकर अस्वस्थ झाले. दिल्लीचं राजकारण आपल्याला जमणार नाही हे त्यांनी ओळखलं. त्याचमुळे त्यांनी गोव्यात परतून मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनातल्या वेदना त्यांनी अनेक मित्रांना त्यांनी बोलून दाखवल्या होत्या. माझ्या मताप्रमाणे हा राफेलचा पहिला बळी आहे अशी धक्कादायक प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

रविवारी संध्याकाळी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर गोव्यावरच नाही तर देशावरही शोककळा पसरली. ते संरक्षण मंत्री असतानाच लष्कराने पहिला सर्जिकल स्ट्राईक केला. गेल्या वर्षभरापासून मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते. त्यांनी त्याही अवस्थेत कर्करोगाशी झुंज दिली. मात्र ही झुंज अखेर संपली, आज अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना निरोप देण्यात आला. मात्र मनोहर पर्रिकर यांच्या निधनाबाबत प्रतिक्रिया विचारली असता, जितेंद्र आव्हाड यांनी मात्र हा ऱाफेलचा पहिला बळी असल्याचं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.