अभिनयाचा श्रीगणेशा नाटय़क्षेत्रातूनच व्हायला हवा, असा विचार मांडणाऱ्या मनोज वाजपेयी या ध्येयवेडय़ा कलाकाराने तीनदा नकार पचवले, पण दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधूनच नाटय़शिक्षण घेण्याचे स्वप्न अखेर साकार केले. नाटय़शिक्षणाच्या याच शिदोरीवर हिंदी चित्रपटसृष्टीत त्याच्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजत आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम फे रीत प्रमुख पाहुणा म्हणून तरुण रंगकर्मीशी संवाद साधण्यास उत्सुक असलेल्या मनोज वाजपेयी यांनी शालेय वयातच मुलांना नाटय़शिक्षणाचे धडे द्यायला हवेत, अशी अपेक्षा ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या निमित्ताने संवाद साधताना त्यांनी व्यक्त केली.

सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकास नाटय़शिक्षणातून होतो. खरे म्हणजे नाटय़प्रशिक्षण शाळाशाळांमधून सक्तीचे करायला हवे. पण दुर्दैवाने आपल्याकडे नाटकालाच फारसे महत्त्व दिले जात नाही, अशी खंतही वाजपेयी यांनी व्यक्त केली.

मनोज वाजपेयी यांनी आपल्या तारुण्याची दहा वर्षे रंगभूमीवर घालवली. नाटय़शिक्षण घेण्याचे विचारबीज त्यांच्या मनात कसे रुजले? ‘मी लहानपणापासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळले होते. ओम पुरी, नसीरुद्दीन शहा यांसारख्या मातबरांच्या मुलाखतींमधून माझी नाटकाशी पहिली ओळख झाली आणि कलाकार व्हायचे तर थिएटर करायलाच हवे, असे मी ठरवले,’ असे वाजपेयी यांनी सांगितले.

‘मी दिल्लीत थिएटर करायला आलो होतो. अभिनय शिकायचा असेल तर थिएटर करणे आवश्यक होते. त्यामुळे मी एनएसडीत प्रवेश केला. दिल्लीत नाटय़शिक्षणाला सुरुवात केली आणि त्यानंतर थोडीथोडकी नाही तर दहा वर्षे मी तिथे रमलो होतो.  दिल्लीत महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना नाटय़स्पर्धामधून घालवलेला वेळ, अभिनयातील गुरू बॅरी जॉन यांच्याकडे काम करतानाचा अनुभव आणि एनएसडीचा काळ.. नाटय़क्षेत्रात व्यतीत केलेला हा मोठा कालखंड आपल्याला समृद्ध करून गेला, असे वाजपेयी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘या दहा वर्षांत मी २०-२५ वर्षांचा नाटय़प्रवास पूर्ण केला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. त्या वेळी मी १८-१८ तास काम करत होतो. एक अभिनेता म्हणून मी जे काही शिकलो ते तिथेच. अभिनयाच्या पद्धती, त्याचे तंत्र, शैली हे सगळे तिथेच आत्मसात केले. नाटक फक्त एक चांगला अभिनेता घडवत नाही, तर नाटकाच्या तालमीतून, तेथील रंगकर्मीच्या सहवासातून एक चांगला, परिपूर्ण माणूसही घडवत असते.’ आज हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून वाजपेयींच्या अभिनयाची प्रशंसा होते त्याचे श्रेयही ते नाटकालाच देतात. ‘माझ्यात अभिनेता म्हणून जे काही रसायन आहे ते नाटकातून; आले आहे. मात्र नाटय़-चित्रपट क्षेत्रात कलाकारांनी सातत्याने शिकत राहिले पाहिजे,’ असे ते जाणीवपूर्वक सांगत ते म्हणतात.. ‘मी जेव्हा जगभरातील नवनवीन कलाकार पाहतो, आपल्या देशातले कलाकार मग ते मराठीतले असोत, हिंदी, तमिळ किंवा तेलुगुतले असोत- त्यांचे काम पाहतो तेव्हा मी त्यांच्याकडूनही शिक ण्याचा प्रयत्न करतो. हे शिकत राहणे आणि दररोज आहे त्यापेक्षा जास्त चांगले होत जाण्याची माझी इच्छा मी जिवंत ठेवली आहे. या इच्छेचे बोट धरूनच मला वाटचाल करायची आहे.’

नव्या पिढीकडूनही शिकले पाहिजे!

लोक मला चांगला वा खूप चांगला अभिनेता म्हणोत- त्यांच्याबद्द्ल मी कृतज्ञ आहे. पण लोकांनी केलेले कौतुक मला शिकण्यापासून थांबवू शकत नाही. आपण जोवर काम करत आहोत तोवर नाटक-चित्रपटात येणारी नवी पिढी  जे नवनवीन प्रयोग करते आहे ते अनुभवले पाहिजेत. ते समजून घेतले पाहिजेत. त्यातूनही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा मंत्रही वाजपेयी यांनी कलाकारांना दिला.