News Flash

शिक्षण विभागात मनुष्यबळाची कमतरता

सात संचालनालयांचा कारभार चार संचालकांच्या खांद्यावर

प्रतिनिधिक छायाचित्र

शाळांची संख्या, नवनव्या योजनांचा पसारा वाढत असताना शालेय शिक्षण विभागात मात्र मनुष्यबळाची कमतरता आहे. संचालक, सहसंचालक, उपसंचालक यांच्या मंजूर पदांपैकी प्रत्यक्षात निम्म्या पदांवरही अधिकारी कार्यरत नाहीत. सात संचालनालयांचा कारभारही चार संचालकांच्या खांद्यावर आहे.

राज्यातील शाळांची संख्या दरवर्षी हजारोंच्या घरात वाढते आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या नवनव्या योजना लागू होत आहेत. असे असताना शालेय शिक्षण विभागाचा कारभार हाकण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ मात्र उपलब्ध नाही. विभागांतर्गत सध्या सात संचालनालये आहेत. मात्र सात संचालकांपैकी सध्या अवघे चार संचालक कार्यरत आहेत. बालभारती, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, माध्यमिक शिक्षण संचालनालय यांसाठीही पूर्ण वेळ संचालक नाहीत. सहसंचालकांच्या १९ पदांपैकी सात पदांवरच अधिकारी आहेत. त्यामुळे राज्यमंडळाच्या नऊ विभागांपैकी चार विभागांसाठीच पूर्णवेळ अध्यक्ष आणि सचिवांची नेमणूक झाली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांना सर्वाधिक विद्यार्थीसंख्या, केंद्र संख्या असलेल्या मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्षपदही प्रभारी आहे. उपसंचालक हे विभागीय पातळीवरील नियमन करत असतात. शुल्काबाबतच्या तक्रारी, प्रवेश प्रक्रिया, योजना राबवणे अशा अनेक बाबी उपसंचालक स्तरावर चालतात. उपसंचालकांच्या ४२ पदांपैकी अवघ्या १८ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. राज्यभरातील शाळांचे जाळे सांभाळणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या ७१ पदांपैकी  २९ पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांपैकीही काहीजण जुलै आणि ऑगस्ट अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यामुळे एकीकडे उत्तम प्रशासन, शिक्षणाचा दर्जा अशा गोष्टी करत असताना विभागाचा कारभार चालवावा कसा असा प्रश्न राहिलेल्या अधिकाऱ्यांपुढे आहे.

पदे रिक्त झाली तरीही पदोन्नतीसाठी पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली नाही. नव्याने नियुक्त्याही वेळेवर करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आता रिक्त पदांचा पेच विभागासमोर उभा राहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 2:08 am

Web Title: manpower shortage in education department abn 97
Next Stories
1 अंतर्गत गुणदान पुन्हा सुरू होणार!
2 वेध विधानसभेचा : १९५७ च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीचा दणका
3 बेस्टची मुंबईकरांना आणखी एक भेट ; लवकरच आणणार ४०० मिनी एसी बसेस
Just Now!
X