मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणासंदर्भात रोज नवीन खुलासे समोर येत असतानाच आता भाजपाने या प्रकरणाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हिरेन यांच्या मृतदेहावरील रुमालांचा शवविच्छेदन अहवालात उल्लेख नसल्याचा दावा केलाय. शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये शवविच्छेदन अहवाल दाखवत यामध्ये हिरेन यांच्या मृतदेहावरील रुमालांचा उल्लेख का नाही असा प्रश्न उपस्थित केलाय. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक खात्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोपही शेलार यांनी केलाय.

नक्की वाचा >> मनसुख हिरेन प्रकरण : डॉक्टर, पोलीस, निर्देश देणारे नेते सर्वांची चौकशी NIA ने करावी; भाजपाची मागणी

यावेळेस शेलार यांनी हिरेन यांच्या मृतदेहावरील रुमालांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. “ज्या वेळेस मुंब्रा येथील खाडीमध्ये हिरेन यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्या मृतदेहाच्या तोंडावर रुमालाच्या पट्ट्या असल्याचं साऱ्या जगाने पाहिलं. मात्र माझ्या हातात असणाऱ्या या शवविच्छेदन अहवालामध्ये मृताच्या शरीरावर कोणतही कापड मिळाल्याचा उल्लेख नाहीय. मृताच्या शरीरावर कोणत्या गोष्टी मिळाल्या याचा उल्लेख करण्याचा तक्ता या शवविच्छेदन अहवालात आहे. मात्र त्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला नाही,” असं शेलार यांना म्हटलं आहे. तसेच फॉरेन्सिक्ससाठी हा मृतदेह पाठवण्याआधी करण्यात आलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये व्हिडीओत स्पष्टपणे दिसणाऱ्या रुमालांचा उल्लेखच नसल्याचा दावा शेलार यांनी केलाय.

रुमालांचा उल्लेख नसल्याचा मुद्दा उपस्थित करत हा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रकार असल्याचं शेलार म्हणालेत. हे रुमाल मटेरियल एव्हिडन्स आहे पुरावा आहेत. मग ते मृतदेहाच्या शरीरावर कोणी उडवले? त्याचा उल्लेख पोस्टमार्टममध्ये का नाही? त्यासंदर्भात निर्देश कोणाचे होते?, यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही? असं शेलार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना शेलार यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांनीच केलाय हे स्पष्ट होत असल्याचा आरोप केलाय.

पत्र लिहून केली मागणी

शेलार यांनी हिरेन यांचा मृतदेह सापडल्यापासून ते अगदी शवविच्छेदनापर्यंत अनेक ठिकाणी कशाप्रकारे पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला यासंदर्भातील माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. यामध्ये हिरेन यांच्या शरीरावरील रुमालांचा उल्लेख शवविच्छेदन अहवालात नसणे, गरज नसणाऱ्या चाचण्या करणे, एटीएसच्या कारवाईमध्ये अडथळा आणणे असे अनेक प्रकार घडल्याचा दावा केलाय. या सर्व गोष्टींसाठी जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करुन हे निर्देश देणारे नेते आणि राजकारणी कोण होते याचा एनआयएने शोध घ्यावा अशी मागणी शेलार यांनी पत्र लिहून केलीय.