मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यासंदर्भात ठाणे न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर आता भाजपाने या प्रकरणातील सर्व व्यक्तींची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनसुख हिरेन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र आपण एनआयएला पाठवल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या यंत्रणांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शेलार यांनी यावेळी केला.

नक्की वाचा >> हिरेन प्रकरण: ‘त्या’ रुमालांबद्दल भाजपाचे चार प्रश्न; पुराव्यांशी पोलिसांनीच छेडछाड केल्याचा आरोप

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यापासून त्याचं शवविच्छेदन होईपर्यंत अनेक ठिकाणी पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शेलार यांनी केला. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आल्यानंतर आपण एनआयएला पत्र पाठवल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे. या सगळ्या प्रकरणात डॉक्टर, लेबोरेट्रीमधील तज्ज्ञ, पोलीस, निर्देश देणारे राजकारणी, नेते सर्वांची चौकशी करावी अशी मागणी आपण केल्याचं शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे.

राज्यातील दहशतवादी विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने ठाणे न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्राच्या एनआयएकडे कागदपत्र आणि पुरावे पाठवले आहेत असं सांगताना शेलार यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. “या प्रकरणात प्रश्न असा आहे की राज्य सरकार ही केस मनसुख हिरेन यांच्या खुनाची केस स्वत:कडे का ठेऊ पाहत आहे?,” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.  या प्रकरणामध्ये राज्य सरकार, मंत्री आणि नेत्यांच्या निर्देशानुसार मोठं षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप शेलारांनी केला आहे. पुरावे नष्ट करणे, पुराव्यात फेरफार करणे, चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न राज्य सरकाराने चालवल्याचा आरोपही शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

नक्की वाचा >> हिरेन प्रकरण: पोस्टमॉर्टमचा व्हिडीओ तुकड्यांमध्ये का?, डायटम टेस्ट का केली?; सरकारने स्पष्टीकरण द्यावं

शेलार यांनी हिरेन यांचा मृतदेह सापडल्यापासून ते अगदी शवविच्छेदनापर्यंत अनेक ठिकाणी कशाप्रकारे पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला यासंदर्भातील माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. यामध्ये हिरेन यांच्या शरीरावरील रुमालांचा उल्लेख शवविच्छेदन अहवालात नसणे, गरज नसणाऱ्या चाचण्या करणे, एटीएसच्या कारवाईमध्ये अडथळा आणणे असे अनेक प्रकार घडल्याचा दावा केलाय. या सर्व गोष्टींसाठी जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करुन हे निर्देश देणारे नेते आणि राजकारणी कोण होते याचा एनआयएने शोध घ्यावा अशी मागणी शेलार यांनी केलीय.