उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या चर्चेत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी अधिवेशनात सर्वात प्रथम सचिन वाझेंचा उल्लेख करत अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांनी या मुद्यावरुन अधिवेशनात सरकारला घेरलं असून ठाकरे सरकारने अखेर सचिन वाझे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सचिन वाझे या सर्व घडामोडींदरम्यान पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली.

सचिन वाझेंबद्दल ठाकरे सरकारकडून मोठा निर्णय; गृहमंत्र्यांनी केली घोषणा

सचिन वाझे दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी पोहोचले होते. तब्बल अडीच तास पोलीस आयुक्त आणि सचिन वाझेंमध्ये चर्चा सुरु होती. सचिन वाझे भेटीनंतर प्रसारमाध्यमांसमोर आले होते. यावेळी त्यांना भेटीत नेमकी काय चर्चा झाली? तसंच बदलीच्या कारवाईसंबंधी विचारण्यात आलं असता सचिन वाझे यांनी बोलण्यास नकार दिला. मी माझं स्टेटमेंट थोड्या वेळात सर्वांना देणार आहे इतकं सांगून ते निघून गेले.

क्राइम ब्रांचमधून सचिन वाझे यांची बदली करणार
“सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल,” अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम होता. बदली नाही तर निलंबन करुन अटक करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.