पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदन अहवालात छेडछाड केली जात असल्याची शंका भाजपाने उपस्थित केली आहे. “पुजा चव्हाण प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लिप सांताक्रुज येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छेडछाड करण्यात येते की काय? तसेच मनसुख हिरेन यांचे शवविच्छेदन अहवालातही छेडछाड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने, या पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करावी,” अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “ठाकरे सरकारची हेराफेरी अजूनही सुरुच आहे. रोज नवीन हेराफेरी ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जातोय. पुजा चव्हाण या भगिनीच्या आत्महत्या, हत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे प्रकरण उघड झाले. त्याचा फायदा घेत राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लीप ज्या सांताक्रूझ येथील फाँरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत, त्यामध्ये छेडछाड सुरु आहे की काय? तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच, असे अहवाल तयार होण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता आहे,” असा आरोप शेलार यांनी केला आहे.
“मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल तसेच शवविच्छेदन करतानाचे रेकॉर्डिंग पोलिसांना पूर्णपणे देण्यात आलेले नाही. त्यामध्ये सुध्दा छेडछाड केली जाते आहे की काय ? अशी शंका आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत पुराव्यांची तपासणी होण्याची गरज आहे,” असं आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा- “त्या मर्सिडीजसोबत भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो, भाजपाचे नेते याचा खुलासा करतील का?”
ठाकरे सरकारची हेराफेरी सुरुच
सांताक्रूझच्या फॉरेन्सिक लॅबमधे पाठवण्यात आलेल्या संजय राठोड प्रकरणातील आँडिओ क्लीप तसेच मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड सुरु?
त्यामुळे या दोन्ही प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या पुराव्यांची तपासणी करण्यात यावी! pic.twitter.com/6VGPqmTrWx
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 17, 2021
मर्सिडीज कार आणि नोटा पोजण्याचं मशीन
एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडीज केली. यात पैसे, कपडे आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली. त्यावर बोलताना शेलार म्हणाले,”एका पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत सापडलेल्या नोटा तसेच पैसे मोजण्याचे मशीन, हाच का तो आघाडी सरकारचा “किमान समान कार्यक्रम” आहे का?,” असा टोलाही शेलार यांनी लगावला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2021 3:06 pm