News Flash

“हे लोक अँटिलियाबाहेर बॉम्ब ठेऊ शकतात, तर माझी हत्या फार छोटी गोष्ट”, व्यावसायिकानं व्यक्त केली भिती!

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आता एका व्यावसायिकाने जीविताला धोका असल्याचा दावा केला आहे.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास सध्या एनआयए करत असून त्यामध्ये अजूनही मुख्य गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. यादरम्यान, वसई-विरारमधील व्यावसायिक मयुरेश राऊत यांचा शुक्रवारी रात्री एनआयएनं जबाब नोंदवून घेतला. मनसुख हिरेन हत्येच्या कटामध्ये आपल्या चोरीला गेलेल्या २ गाड्यांचा वापर केल्याचा संशय मयुरेश राऊत यांना आहे. त्यासंदर्भात त्यांनी तक्रार देखील केली आहे. याचबाबत एनआयएनं मयुरेश राऊत यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. यावेळी आपल्या जीविताला धोका असून आपल्याला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी केली आहे. “हे लोकं काहीही करू शकतात. ते जर अँटिलियाबाहेर बॉम्ब ठेऊ शकतात, तर माझी हत्या ही फार छोटी गोष्ट आहे”, असं मयुरेश राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.

२०१७मध्ये चोरीला गेल्या गाड्या!

मयुरेश राउत यांनी दावा केल्याप्रमाणे, २०१८मध्ये त्यांच्या २ गाड्या चोरीला गेल्या होत्या. त्या अद्यापपर्यंत त्यांना सापडलेल्या नाहीत. मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर त्यांनी एनआयएकडे यासंदर्भात तक्रार देखील केली होती. मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात आपल्या चोरीला गेलेल्या गाड्यांचा वापर झाल्याचा संशय मयुरेश राऊत यांना आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह, प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांची नावं घेतली आहेत. “या प्रकरणात कुणी दोषी आढळलं, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन एनआयएनं दिलं”, अशी माहिती मयुरेश राऊत यांनी चौकशीनंर पत्रकारांशी बोलताना दिली.

सरकारला माझी विनंती आहे…

“माझ्या गाड्या चोरीला गेल्याप्रकरणी अजूनही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. त्या आजही त्या तिघांनी किंवा पोलिसांनी लपवून ठेवल्या आहेत. मी गृहमंत्र्यांना देखील भेटलो, भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या डीजींनाही भेटलो. माझी सरकारला विनंती आहे की तातडीने विरार पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत”, अशी मागणी मयुरेश राऊत यांनी केली आहे.

माझी हत्या फार छोटी बाब!

दरम्यान, आपल्या जीविताला धोका असल्याचा दावा राऊत यांनी यावेळी केला. “मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे माझ्या जिवाला देखील धोका आहे. मनसुख हिरेन त्यांच्या जवळचा मित्र असून त्याची हत्या झाली. मग माझा आणि त्यांचा तर दूरदूरचा संबंध नाहीये. मला धमक्यांचे भरपूर फोन येतात. हे लोकं काहीही करू शकतात. जर अँटिलियाबाहेर ही लोकं बॉम्ब ठेऊ शकतात, तर माझी हत्या करणं फार छोटी बाब आहे”, असं राऊत म्हणाले.

“…म्हणून परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले”, अनिल देशमुखांचा माजी पोलीस आयुक्तांवर निशाणा!

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आत्तापर्यंत सचिन वाझे यांच्यासोबतच निलंबित पोलीस अधिकारी सुनील माने, रियाज काझी, निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे, बुकी नरेश गोर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एनआयए तपास करत आहे. दुसरीकडे परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर सीबीआय तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सहभागाचा तपास करत आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशांव्यतिरिक्त इतर प्रकरणात देखील सीबीआय तपास करत असल्याचा दावा करत अनिल देशमुखांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 10:16 am

Web Title: mansukh hiren murder case nia inquiry businessman mayuresh raut claims life threat pmw 88
Next Stories
1 गोष्ट मुंबईची : मध्य रेल्वेच्या स्थानकांची नावं कशी पडली?
2 मुलांच्या रक्षणासाठी कृतिगट
3 केंद्रापेक्षा राज्याच्या कर्जरोख्यांना अधिक प्रतिसाद
Just Now!
X