मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक आणि एक वरिष्ठ पोलीस अधिकारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर असून लवकरच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान अटकेत असणारे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी एनआयला मनसुख हिरेन यांचा मृतेदह सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (६ मार्च) आपल्याकडील पाच मोबाइल नष्ट केल्याची माहिती दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यामध्ये त्यांचा कार्यालयीन मोबाइलही होता.

सचिन वाझेंच्या कार्यालयीन मोबाइलमधील डाटा मिळवण्यासाठी एनआयए प्रयत्न करत असून यासाठी काही तज्ञांची मदत घेतली जात आहे. हिरेन प्रकरणी मोबाइलमधून अनेक पुरावे हाती लागण्याची एनआयएला शक्यता वाटत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे एकूण १३ मोबाइल वापरत होते.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्या प्रकरणी एनआयए तपास करत आहे. याशिवाय हे वाहन ज्यांच्या मालकीचं होतं त्या मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचाही एनआयएकडून तपास सुरु आहे. ५ मार्च रोजी कळव्यातील खाडीत त्यांचा मृतदेह सापडला होता. एटीएस या प्रकरणाचा तपास करत होतं. मात्र कोर्टाने एटीएसला हा तपास एनआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे.

एनआयएने एका हॉटेल व्यवसायिकाचा जबाब नोंदवला आहे. ज्यामध्ये त्याने आपण ३ मार्चला वाझेंना हफ्ता देण्यासाठी गेलो असता तिथे हिरेन, अटक कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि क्राइम ब्रांचमधील पोलीस निरीक्षक यांच्यात चर्चा सुरु असल्याचं पाहिलं होतं असं सांगितलं आहे. एनआयए त्या पोलीस निरीक्षकाची चौकशी करणार आहे.

याशिवाय एनआयएला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचीही चौकशी करायची आहे ज्याने दक्षिण मुंबईतील एका व्यवसायिकाला फोन करुन वाझेंच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील वास्तव्याचं १३ लाखांची बिल भरण्यास सांगितलं होतं. व्यवसायिकाने एनआयएला दिलेल्या माहितीनुसार, एका ज्वेलरने ५० ते ६० लाखांची फसवणूक केल्याची तक्रार आपण केली होती. जर आपण हॉटेलचं बिल भरलं तर सचिन वाझे हे पैसे परत मिळवण्यात मदत करतील असं अधिकाऱ्याने आपल्याला सांगितलं होतं.