मधुमेहतज्ज्ञ आणि करोना कृतीदलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्याशी वेबसंवाद

मुंबई : सध्याच्या करोनाग्रस्ततेच्या काळात मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची सूचना वैद्यकीयक्षेत्रातील तज्ज्ञ सातत्याने देत आहेत. मधुमेहाच्या रुग्णांना अधिक धोका का? करोनाची साथ, उन्हाळा आणि तणाव अशा या वातावरणात काळजी कशी घ्यावी? रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात कसे ठेवावे? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे बुधवारी (२९ एप्रिल) सायंकाळी ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या वेबसंवादात मिळणार आहेत. विख्यात मधुमेहतज्ज्ञ आणि शासनाच्या करोना कृतीदलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी ‘मधुमेहाचे आव्हान आणि करोना काळ’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

देशभरातील करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे समोर आले आहे. मात्र योग्य काळजी घेतल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. या काळात मधुमेहींनी अधिक निगुतीने स्वत:चे आरोग्य, जीवनशैली यांची काळजी घेणे आवश्यक आहे. ही काळजी कशी घ्यावी? दैनंदिन वेळापत्रक कसे असावे, अशा प्रश्नांवर ‘लोकसत्ता’ वेबसंवादात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. घरात अधिक वेळ असल्यामुळे व्यायामाचा अभाव, बदललेली दिनचर्या, तणाव यांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका अधिक आहे. अशा वातावरणात मधुमेहाचे दुखणे उद्भवू नये म्हणून काय करावे, याबाबतही डॉ. जोशी मार्गदर्शन करतील.

डॉ. जोशी हे विख्यात मधुमेहतज्ज्ञ आहेत. आरोग्यक्षेत्रातील योगदानासाठी त्यांचा २०१४ मध्ये पद्मश्रीने सन्मान करण्यात आला आहे. मधुमेह, लठ्ठपणा या विषयावरील त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सहाशेहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. अनेक आंतराराष्ट्रीय शोधपत्रिका, नियतकालिके यांचे संपादनही ते करतात. ‘द इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ डायबेटिस’ आणि ‘द असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ या संस्थांचे ते अध्यक्ष आहेत.

कसे सहभागी व्हाल?

करोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदी- संचारबंदीच्या काळात हा संवाद वेबच्या माध्यमातून म्हणजेच मोबाइल, लॅपटॉप आणि टॅबद्वारे होईल. त्यासाठी http://tiny.cc/Loksatta_Aarogyaman या लिंकवर जाऊन नोंदणी करायची आहे. त्यानंतर आपल्या ईमेल आयडीवर एक संदेश येईल. या संदेशावर बुधवार, २९ एप्रिल रोजी वेबसंवादाच्या काही वेळ आधी क्लिक करून सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी  http://loksatta.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.