अन्नसुरक्षा घोटाळ्यातील अर्ज अन्न नागरी व पुरवठामंत्र्यांकडे कारवाईसाठी पाठवू नये म्हणून मंत्रालयातील आवक शाखेतील लिपिकाने दोन दलांलातर्फे ३० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी लिपिकासह दोन दलालांना अटक केली. महात्मा फुले पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेकचंद गिलानी, अशोक वाधवा या व्यावसायिकांविरुद्ध अन्नसुरक्षा योजनेत घोटाळा केल्याबद्दल तक्रार अर्ज अन्न व पुरवठामंत्र्यांकडे करण्यात आले आहेत. हे अर्ज मंत्र्यांकडे पाठवण्यात येऊ नयेत यासाठी  किशोर शिंदे या लिपिकाने विनोद आखाडे, सुनील बनसोडे या दलालांतर्फे व्यावसायिकांकडे ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या लाचेतील ३० हजार रुपयांचा हप्ता व्यावसायिकांकडून स्वीकारताना कल्याणमध्ये अटक करण्यात आली.