५० ते ६० कबुतरे, चिमण्या आणि कावळ्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत

डोंबिवलीच्या औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटात मनुष्यहानी किती झाली, आर्थिक हानी किती झाली याचा लेखाजोखा सध्या मांडला जात आहे. परंतु, या भीषण स्फोटात वाताहत झालेल्या अनेक मुक्या जीवांचीही मोठी वाताहात झाली आहे.

या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आजूबाजूच्या परिसरातील झाडे लांबपर्यंत फेकली गेली. या झाडांच्या आडोशाला बसलेल्या अनेक पक्ष्यांना यामुळे जीव गमवावा लागला. अशा सुमारे ५० ते ६० कबुतरे, चिमण्या आणि कावळ्यांची वाताहत झाल्याचे निदर्शनास आले आहे. स्फोटानंतर या पक्ष्याचे छिन्नविछिन्न अवस्थेतील देह या परिसरात पडले होते. स्फोटानंतर बचावकार्य सुरू असताना अनेक जखमी पक्ष्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.

या ठिकाणी जवळच बैलाला बांधून ठेवण्यात आले होते. मात्र बांधून ठेवल्यामुळे जखमी झालेल्या बैलाला पळणेही शक्य झाले नाही आणि रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू ओढवला. त्याबरोबरच स्फोट झालेल्या कंपनीची इमारत कोसळली तेव्हा त्याखाली दोन श्वान बसले होते. मात्र अचानक घटलेल्या घटनेमुळे ते भेदरून गेले. त्यामुळे त्यांना पळणेही शक्य झाले नाही आणि ते इमारती खाली गाडले गेले. यात एका खंडय़ा पक्ष्यालाही आपले प्राण गमवावे लागल्याचे या स्फोटानंतर येथील परिसराची पाहणी करणाऱ्या ‘प्लांट अ‍ॅन्ड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटी’ (पॉझ) या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांना आढळून आले.

‘गबरू’च्या नावाचे फलक

प्राणी-पक्ष्यांच्या बचावासाठी संस्थांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन समूहाची गरज व्यक्त होते आहे. ज्यामुळे अशा परिस्थितीत अडकलेल्या पक्षी आणि प्राण्यांची सुटका करणे शक्य होईल. डोंबिवली येथील एक रहिवाशी रवी गिरी यांनी त्यांचा श्वान ‘गबरू’ हरविल्यानंतर रस्त्यावर गबरू हरविल्याचे फलक लावले होते. गबरू आल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झाला. याबरोबरच स्फोटात पळून गेलेल्या लाल्याचा शोध घेण्यातही ‘पॉझ’ यशस्वी झाले असल्याचे भणगे यांनी सांगितले.