मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांपासून सुरू झालेल्या मी टू मोहिमेला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. चित्रपटसृष्टीतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमही बदलण्याची तयारी अनेक कंपन्यांनी केली आहे.

राज्य महिला आयोगाने तनुश्रीच्या तक्रारीची दखल घेतली आहे. त्यात दिग्दर्शक विकास बहल यांच्यावरील लैंगिक गैरवर्तनासंबंधीच्या आरोपांनंतर फँटम या निर्मिती संस्थेतील संस्थापकांमध्ये निर्माण झालेला वाद नोटिसा आणि आरोप-प्रत्यारोप अशा वळणाने जाऊ लागला आहे. एकीकडे आरोप झालेल्या मंडळींनी कायदेशीर सल्ले घेत उलट प्रतिक्रिया दिल्याने आरोप-प्रत्यारोपांची राळ उडते आहे, तर दुसरीकडे या प्रकारांची गंभीर दखल घेत सिन्टा, फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉईज यासारख्या वेगवेगळ्या चित्रपट संघटना आणि चित्रपट निर्मिती कंपन्यांना जाग येत आहे. त्यांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केलेल्या महिला कलाकारांना पाठिंबा देत मदतीची तयारी दर्शवली आहे.

विकास बहल, चेतन भगत, अलोकनाथ, वरुण ग्रोव्हर, सुहेल सेठ यांच्यावरही लैंगिक गैरवर्तन आणि छळाचे आरोप झाले आहेत. अलोकनाथ यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले आहेत. विकास बहल यांनी, अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्यावर, आपली कारकीर्द संपवण्यासाठी व्यावसायिक ईष्र्येतूनच त्यांनी हा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. विकासने या दोघांनाही कायदेशीर नोटीस पाठवली असून त्यांनी आपल्याविरोधातील ट्वीट नष्ट करून समाजमाध्यमावर विनाअट माफी मागावी, असे म्हटले आहे. विकास बहलचे वकील शमशेर गरुड यांनी,

विकासवर एका महिलेने आणि अभिनेत्री कंगना रणौत आणि नयानी दीक्षित यांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर फँटम फिल्म्स ही निर्मिती संस्था बंद करण्यात आली. त्याचबरोबर विकासला ८३ या चित्रपट निर्मितीतूनही वगळ्यात आले. तर अभिनेता ऋतिक रोशननेही सुपर ३० या चित्रपटाच्या श्रेयनामावलीतून विकासला हटवण्याची मागणी केली आहे.  इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डिरेक्टर्स या संघटनेनेसुद्धा विकासला आरोपांबाबत सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉईज या संघटनेनेही बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाना पाटेकर, अलोकनाथ आणि विकास बहल यांना त्यांच्या वर्तणुकीबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी दहा दिवसांत या नोटिशीचे उत्तर दिले नाही तर संघटनेचे पाच लाख सदस्य त्यांच्यावर बहिष्कार टाकतील, असे संघटनेचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी स्पष्ट केले.  सेक्रेड गेम्स या वेब सीरिजसाठी लेखन करणारा वरुण ग्रोवर याच्यावरही लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप एका महिलेने केला आहे.