निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निरंजन डावखरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपात येण्यासाठी खूप लोक रांगेत आहेत असं सूचक विधान केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण पदवीधर संघाची उमेदवारी निरंजन डावखरेंना जाहीर केली आहे. निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे ते चिरंजीव असून वडिलांच्या निधनानंतर ते राष्ट्रवादीत एकाकी पडल्याची चर्चा होती.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व चांगल्या लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच आम्ही निरंजन डावखरेंना सोबत घेतलं असल्याचं सांगितलं. राष्ट्रीय पक्षात येण्याची त्यांची इच्छा होती. आमचीही त्यांनी सोबत यावी अशी इच्छा होती. आमचं तसं बोलणं झालं असल्याचंही त्यांनी म्हटलं. तरुण तडपदार नेतृत्व मिळाल्याने भाजपाला फायदा होईल. मोलाचा सहभाग मिळेल, एक चांगलं नेतृत्व मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान निरंजन डावखरे यांनी शरद पवार मोठे नेते आहेत पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा आहे असं सांगितलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना अजून काही नेते भाजपात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचं विचारलं असता खूप लोक रांगेत आहेत, तुम्ही वाट पहा असं उत्तर दिलं.

गेल्या ४ वर्षात महाराष्ट्राला जे मिळालं, ते गेल्या २० वर्षात मिळालं नव्हतं असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. गेल्या २५ वर्षात एखादं सरकार हिमालयासारखं देशवासीयांच्या मागे उभं असेल तर ते केंद्र सरकार आहे अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमने उधळली आहे.

यावेळी त्यांनी वाढत्या इंधन दरावरही भाष्य केलं. “मागच्या काळात आपण दर कमी केला होता. इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते. केंद्र सरकारनं टास्क फोर्स निर्माण करुन दर कमी कसे करता येतील यासाठी कारवाईला सुरुवात केली आहे. जीएसटी लावला तर दर कमी होऊ शकतात, पण त्यासाठी सर्व राज्यांना एकत्र आणणं गरजेचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. जीएसटी काऊन्सिलमध्ये सर्व राज्यांचे अर्थमंत्री सहभागी असतात. एकमत होणं गरजेचं असून ते लवकरच होईल अशी अपेक्षा आहे असंही त्यांनी म्हटलं.