मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांच्या पहिल्या सत्राच्या उपयोजित गणित (अ‍ॅप्लाइड मॅथेमॅटिक्स) या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत २१ गुणांच्या चार चुका आढळून आल्या असून त्या विद्यार्थ्यांना कळेपर्यंत बराच वेळ गेला. परिणामी अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र प्रश्नपत्रिकांतील चुकांना ‘सरावलेल्या’ विद्यापीठाला मात्र या चुका ‘दिसल्या’च नाहीत. असे काही घडलेलेच नाही, असा पवित्रा विद्यापीठाने घेतला आहे. पण प्रश्नपत्रिकांवर नजर टाकल्यास त्यातील चुका सहज कळू शकतात.
मंगळवारी अभियांत्रिकीच्या उपयोजित गणित या विषयाची परीक्षा सकाळी ११ ते २ या वेळात होती. या प्रश्नपत्रिकेत मोठय़ा प्रमाणावर चुका आढळून आल्या आणि या दुरुस्त करण्यामध्ये विद्यार्थ्यांचा बराच वेळ गेला. इतकेच नव्हे तर पहिल्या प्रश्नातील चूक समजण्यासही बराच उशीर झाला होता. तोपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांनी तो प्रश्न सोडवण्यात आपला वेळ घालविला होता. दुरुस्ती कळल्यावर अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा हा प्रश्न सोडवावा लागला.
या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिल्या प्रश्नातील ‘सी’ या उपप्रश्नात चूक होती. या चुकीची दुरुस्ती सर्वात शेवटी कळविण्यात आल्याचे एका विद्यार्थ्यांने सांगितले. या आधी या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक तीनमधील ‘ए’ या उपप्रश्नात दोन दुरुस्त्या व एक कॅपिटल एक्स वगळण्याचे सांगण्यात आले. पुढे प्रश्न क्रमांक पाचमधील ‘ए’ या उपप्रश्नातही चुका आढळून आल्या. त्याची दुरुस्तीही विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.
या सर्व चुकांचे २१ गुण होत होते. पहिल्या प्रश्नातील चुकांची दुरुस्ती वेळेवर कळली असती तर बराच वेळ वाचला असता, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. विद्यार्थ्यांचे अक्षर कळले नाही तर शून्य गुण देणारे विद्यापीठ प्रश्नपत्रिकेतील चुकांपायी संबंधित प्रश्नांना पूर्ण गुण देणार का, असा प्रश्न विद्यार्थी विचारू लागले आहेत.

विद्यापीठाचे ‘किरकोळ’ समर्थन
या संदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. पद्मा देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता प्रश्नपत्रिकेमध्ये चुका नाहीतच, असा आश्चर्यकारक दावा त्यांनी सुरुवातीला केला. थोडय़ा वेळाने पुन्हा एकदा संपर्क साधल्यावर मात्र आपला सूर बदलला. काही किरकोळ चुका होत्या. मात्र त्या वेळेत विद्यार्थ्यांना कळविण्यात आल्या, असा खुलासा केला. २१ गुणांच्या प्रश्नांमध्ये चुका असल्याचे त्यांना सांगितल्यावरही किरकोळच चुका असल्याचे पालुपद त्यांनी कायम ठेवले.