रेल्वेच्या गर्दीवर उतारा म्हणून कामकाजाच्या वेळेमध्ये बदल करण्याचा विचार केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मांडला असला तरी मुंबईत पावसाळ्यात रेल्वेचा, रस्त्यावरील वाहतुकीचा उडणारा बोजवारा पाहता आपल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी अनेक खासगी कंपन्यांनी कामाचा ‘फ्लेक्झी टाइम’ फंडा शोधला आहे.

अनेकदा रेल्वेचा गोंधळ, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची कार्यालय गाठताना दमछाक होते. ते उशिराने येतात. पावसाळ्यात हा गोंधळ अधिकच असह्य़ होतो. याचा परिणाम कामावर होत असल्याने अनेकांना वरिष्ठांचा ओरडाही सहन करावा लागतो. यावर सुवर्णमध्य साधत अनेक खासगी कंपन्यांनी परदेशातील कंपन्यांप्रमाणे मार्ग अवलंबला आहे. कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम न होता घरून काम करण्याची परवानगी देणे, घरापासून जवळ असलेल्या कंपनीच्या कार्यालयातून काम करण्याची परवानगी देणे असे अनेक पर्याय कंपन्या अजमावत आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत लवचीकता आणून (फ्लेक्झी टाइम) तीन-चार वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये काम करण्याचा नवा मार्गही मुंबईतील काही कंपन्यांनी अनुसरला आहे.

काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्र्यांनीही लोकलच्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईतील कार्यालयीन वेळा बदलण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली; परंतु मुंबईतील खासगी कंपन्यांनी या प्रश्नावर आपल्या परीने तोडगा काढला आहे. मुंबईत विक्रोळी, गोरेगाव, नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी कार्यालये असलेल्या अ‍ॅक्सेंचर या कंपनीने आपल्या काही अधिकाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे, तर पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरापासून जवळ असलेल्या कार्यालयात बसून काम करण्याची मुभा दिली जाते, तर वरळीच्या सिएट या टायर उत्पादक कंपनीने कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ७.३० ते ४.३० अशी कामाची वेळ ठरवून दिली आहे. एरवी १० ते ६ ही कामाची वेळ आहे. अर्थात ही मुभा पावसाळ्यातच असणार आहे. ‘‘पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी, रेल्वेचा खोळंबा यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत येताना किमान २-३ तास इतका उशीर होतो. त्यामुळे आम्ही कामाची वेळ बदलून घेतली आहे,’’ अशी माहिती कंपनीतील एका कर्मचाऱ्याने दिली.

आमच्या कार्यालयात घरातूनच कार्यालयीन काम करण्याची मुभा दिली आहे. तसेच कंपनीत आपल्या वेळेनुसार जाण्याचीदेखील परवानगी आहे. याचा चांगलाच फायदा होतो. यामुळे घरच्यांनादेखील वेळ देणे शक्य होते.

– मेघना जोशी, कर्मचारी, आयटी कंपनी