नामवंत शाळांची बनवेगिरी उघड

दहावीचा निकाल फुगविण्याकरिता विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी नववीलाच मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याचा ‘शॉर्टकट’ अवलंबण्यात मुंबईतील अनेक नामवंत शाळांचाही समावेश आहे.

आतापर्यंत या शाळा कृत्रिमरीत्या निकाल कसा फुगवतात याची केवळ चर्चाच होत होती. परंतु, दक्षिण मुंबईच्या शिक्षण निरीक्षकांनी प्रथमच आपल्या विभागातील ३७२ शाळांकडे नववीच्या निकालाच्या आकडेवारीसाठी पाठपुरावा करत या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. त्यात ३७४पैकी २०१५मध्ये ५० अधिक अनुत्तीर्ण विद्यार्थी ज्या शाळांमध्ये होते अशा तब्बल ३३ शाळा आढळून आल्या. परंतु, शिक्षण विभाग याच आकडेवारीवर न थांबता त्यांनी शाळांचा दहावीचा निकालही मागविला. त्यात नववीला ७०-८० टक्क्यांच्या आसपास निकाल असलेल्या अनेक शाळांनी दहावीला मात्र नव्वदीपार निकालाचा झेंडा रोवल्याचे दिसून आले आहे.

३३पैकी पालिकेच्या काही शाळा वगळल्या तर उर्वरित खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांचे निकाल १०० किंवा ९५ टक्क्यांच्या पुढेच आहेत. अनेक नामवंत शाळांचीही बनवेगिरी यामुळे उघड झाली आहे. उदाहरणार्थ गुरुनानक हायर सेकंडरी स्कूलमध्ये नववीला ५१२ पैकी १९५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. पण, शाळेचा दहावीचा निकाल आहे, ९८.३७ टक्के. दहावीचा १००टक्के निकाल असलेल्या मारवारी विद्यालयात नववीला मात्र ३८६पैकी तब्बल १०४ विद्यार्थी नववीला अनुत्तीर्ण झाले होते. सेंट इसाबेलमधील १६६ पैकी ५८ विद्यार्थी नववीला अनुत्तीर्ण झाले होते. शाळेचा दहावीचा निकाल मात्र ९८.६६टक्के! तर दहावीला ९६.३टक्के निकाल असलेल्या गुरुनानक नॅशनल हायस्कूलमधील १४१पैकी ५६ विद्यार्थी नववीला अनुत्तीर्ण होते.

दक्षिणपाठोपाठ उत्तर व पश्चिम मुंबईतील निरीक्षकांनीही आपल्या अखत्यारीतील शाळांचे नववीचे निकाल मागविले. येथील शाळांचे निकालही धक्कादायकच होते. (पाहा चौकट) नववीला ८४ टक्क्यांच्या आसपास निकाल असलेल्या संपूर्ण मुंबई विभागाचा दहावीचा निकाल मात्र ९२.६४ टक्के इतका आहे. ही तफावत तब्बल आठ टक्क्यांची आहे!

कच्च्या विद्यार्थ्यांवर मेहनत घ्यायला वेळ नाही

दहावीचा निकाल १००टक्के लावण्याकरिता नववीत कच्चे विद्यार्थी नापास केले जातात. पहिली ते आठवीपर्यंत सातत्यपूर्ण व र्सवकष मूल्यमापन (सीसीई)असल्याने अभ्यासक्रमातील काठीण्य पातळीतील कमालीचा चढउतार, मूल्यमापन पद्धतीतील विविध टप्प्यांवरील भिन्नता, अनियमितता याचा फरक नववीच्या अभ्यासावर होतो. शाळा दोन्ही वेळेत भरत असल्याने कच्च्या विद्यार्थ्यांवर मेहनत घ्यायला वेळ नसतो, अशा शब्दांत दक्षिण मुंबईचे निरीक्षक आणि उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी या प्रश्नाची कारणमीमांसा केली. हा निकाल उंचावण्याकरिता सीसीईची नववीपर्यंत अंमलबजावणी करणे, शाळांना प्रत्येक मुलाकडे लक्ष देण्यास भाग पाडणे, पहिली ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाशी मिळतीजुळती नववीच्या अभ्यासक्रमाची रचना करणे, त्याच प्रकारचे मूल्यमापन नववी-दहावीलाही लागू करणे आदी उपाय त्यांनी सुचविले.

नववीला गळती जास्त

दक्षिण मुंबईत नववीला नापास झाल्याने गळती झालेल्यांमध्ये मुलींपेक्षा मुलांचेच प्रमाण अधिक आहे. अनुत्तीर्ण झालेल्या २७२६पैकी तब्बल १५८३ इतके मुलगे आहेत. तर मुलींची संख्या ६८२ इतकी आहे.

२५४ प्रवाहातूनच बाहेर

नववीला नापास झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील शाळांमधील ७९८ इतके विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात बसले. तर ९८३ इतक्या विद्यार्थ्यांनी मार्च, २०१५मध्ये १७ क्रमांकाचा अर्ज भरून दहावीच्या परीक्षेला खासगीरीत्या बसणे पसंत केले. परंतु, २५४ विद्यार्थी ना धड नववीच्या वर्गात बसले ना त्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यामुळे, हे विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर पडण्याचीच शक्यता अधिक.

५०हून अधिक अनुत्तीर्ण विद्यार्थी असलेल्या शाळा

विभाग                 शाळा

दक्षिण मुंबई             ३३

उत्तर मुंबई              ३७

पश्चिम मुंबई            ४५

एकूण                     ११५