विविध आंदोलनांमुळे गाजलेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) पूर्वपरीक्षा रविवारी सुरळीत पार पडली. मात्र, नकारात्मक गुण नसलेले निर्णयक्षमतेवर आधारित प्रश्नच यंदा विचारण्यात न आल्याने असंख्य विद्यार्थ्यांची कोंडी झाली. गणित आणि विज्ञान या विषयांवर आधारित प्रश्नांचाच भरणा अधिक असल्याने कला आणि वाणिज्य शाखेतील परीक्षार्थीसाठी ही परीक्षा अवघड गेली. तर सीसॅटचा पेपर लांबलचक असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना वेळेचे गणितही साधता आले नाही.
प्रादेशिक भाषांमध्ये पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणे सोपे जावे यासाठी गेले महिनाभर विविध ठिकाणी आंदोलने झाली. या पाश्र्वभूमीवर रविवारी पूर्वपरीक्षा पार पडली. यामुळे सर्वाचेच याकडे लक्ष लागले होते. या परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतात. यात कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जावेत यासाठी कोणतेही निकष नाहीत. पण सर्वसाधारणपणे या परीक्षेत निर्णय क्षमतेवर आधारित प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांना नकारात्मक गुणपद्धती नसते म्हणजे या प्रश्नाचे उत्तर चुकले तरी गुण कमी होत नाही. यामुळे हे प्रश्न विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक असतात. यंदा याबाबतचा एकही प्रश्न न विचारल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
 प्रश्नपत्रिकेत गणित आणि विज्ञान विषयांचा प्रश्नांचा प्रभाव जास्त असल्यामुळे कला आणि इतर शाखांतील पदवीधर विद्यार्थ्यांना ही परीक्षा अवघड गेल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तर पुन्हा एकदा ही प्रश्नपत्रिका अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी असल्याचे एका विद्यार्थ्यांने म्हटले. ही प्रश्नपत्रिका पाहून केंद्राला निर्णय घेणारे अधिकारी हवे आहेत की व्यवस्थापन करणारे अधिकारी हवे आहेत असा प्रश्न निर्माण होत असल्याचे मतही या विद्यार्थ्यांने व्यक्त केले आहे. इंग्रजी उताराही खूप मोठा होता, असे मतही या विद्यार्थ्यांने नोंदविले.
‘पेपर १’मध्ये इंग्रजी भाषेतील परिच्छेदाचे हिंदीत भाषांतर करणे या स्वरूपाच्या प्रश्नात चुका आढळल्या, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार केली. मात्र सरकार आणि आयोगाने त्याची दखल घेतली नाही.
संतुलन साधता आले नाही
प्रश्नपत्रिकेमध्ये संतुलन असावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. पण रविवारी पार पडलेल्या परीक्षेत संतुलन साधले न गेल्याचे मत राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील प्राध्यापक भूषण देशमुख यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने सीसॅटचा पुनर्विचार करण्यासाठी नेमलेली खासदारंची समिती याबाबत योग्य तो विचार करून परीक्षेत संतुलन आणेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तर दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये किमान गुणांची मर्यादा ही प्रत्येकी ७० ते ८० असावी अशी अपेक्षा लक्ष्य अकॅडमीचे अजित पडवळ यांनी व्यक्त केली. यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रश्न जास्त आले किंवा कमी आले तरी सर्व शाखांतील उमेदवारांना न्याय मिळू शकतो, असे ते म्हणाले.
९ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा
देशभरातून सुमारे नऊ लाख विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा दिली. ‘पेपर १’ आणि ‘पेपर २’ अशा प्रकारांमध्ये ही पूर्वपरीक्षा घेण्यात आली. पेपर २ म्हणजेच सीसॅट या पेपरबद्दल देशभरात तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली होती. या पद्धतीत बदल करण्याची मागणी करत अनेक उमेदवार रस्त्यावर उतरले होते आणि हिंसक आंदोलन झाले. त्यामुळे परीक्षादरम्यान निदर्शने होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले. मात्र या पेपरविरोधात आमचे आंदोलन कायम असेल, असे विद्यार्थ्यांच्या एका संघटनेने सांगितले.
विद्यार्थिसंख्या का वाढली?
आतापर्यंत देशात या परीक्षेसाठी साधारण तीन ते साडेतीन लाख विद्यार्थी परीक्षा देत होते. मात्र, या वर्षी या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. यंदा साधारण ९ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या वर्षी आयोगाने परीक्षा देण्याच्या दोन संधी वाढवल्या, त्याचप्रमाणे वयोमर्यादेची अट दोन वर्षांनी शिथिल केली. त्यामुळे अनेक उमेदवारांना या परीक्षेच्या स्वरूपात आणखी एक संधी देण्यात आली. २०११ मध्ये परीक्षा दिलेल्या उमेदवारांनाही ही परीक्षा देण्याची संधी देण्यात आली. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली.त्यामुळे परीक्षा देणाऱ्यांचा ओघ या वर्षी वाढला आहे.
अंध विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून २० मिनिटे जास्त
यूपीएससी देणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रत्येक तासामागे २० मिनिटे जास्त देण्याची मागणी दिल्लीतील एका स्वयंसेवी संस्थेने केली होती. मात्र, मुळातच अंध विद्यार्थ्यांचा कट ऑफ स्वतंत्रपणे काढण्यात येतो आणि त्यांना गुणांमध्ये सवलत असते. त्यामुळे परीक्षेसाठी जास्त वेळ देण्यात येणार नाही अशी भूमिका आयोगाने घेतली होती. मात्र, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे या परीक्षेपासून अंध विद्यार्थ्यांना प्रत्येक तासामागे २० मिनिटे अतिरिक्त देण्यात आली आहेत.