वाडा-पिंजाळ मार्गावरच्या गारगाई नदीवरील पूल रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक कोसळला. पूल कोसळण्याआधी पाच मिनिटांपूर्वीच या पुलावरून एक मालवाहू ट्रक निघून गेला होता. हा पूल कोसळल्यामुळे या परिसरातील गारगाव, दाभोण, िपजाळ या प्रमुख गावांसह अनेक पाडय़ांचा संपर्क तुटला आहे.
३० वर्षां जुना असलेल्या या पुलाला गेल्या दोन वर्षांपूर्वीपासून तडा गेला होता.  या पुलाच्या दुरुस्तीची मागणी वाडा पंचायत समितीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. परंतु या दोन वर्षांत त्यांच्या अधिकाऱ्याने अथवा कर्मचाऱ्यांनी या पुलाकडे ढुंकूनही पाहिले नाही.  
रविवारी रात्री पूल कोसळण्याच्या पाच मिनिटे आधीपर्यंत या पुलावरून वाहतूक सुरू होती. या पुलाचा खांब आणि त्यावरील स्लॅब कोसळून पाण्यात पडला. नदी पाण्याने भरली असून हा अपघात घडला, त्यावेळी पुलावर वाहन नव्हते. पूल कोसळल्याने या परिसरातील अनेक गावांतील नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या परिसरात जाण्यासाठी पीक-शिलोत्तर या मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या मार्गामुळे या परिसरातील नागरिकांना ८ ते १० किलोमीटरचा अधिक फेरा घालावा लागत आहे.
तात्पुरत्या दुरुस्तीसाठी विरोध..
हा संपूर्ण पूल कमकुवत असल्याने या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करू नये. तात्काळ नवीन पुलाचे अंदाजपत्रक तयार करावे आणि नवीन पुलाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील यांनी केली आहे.