मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी अभिनेता संजय दत्तने आपली पत्नी मान्यता आजारी असल्याचे कारण देऊन तुरुंगातून ३० दिवसांची सुट्टीची ‘मान्यता’ मिळवली होती. मात्र, आता या सुट्टीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.  मान्यता अगदी ठणठणीत असून, ती एका प्रिमियरला उपस्थिती राहिल्याचे फोटो प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्याने संजूबाबा खोटे बोलत असल्याचे समोर आले आहे. आता त्याच्या ‘पॅरोल’बाबत तुरुंग प्रशासन फेरविचार करणार की त्याची सुट्टी कायम ठेवणार, याकडे  लक्ष लागले आहे.
संजय दत्त यापूर्वी २ ऑक्‍टोबरला पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला होता. त्‍यावेळेस त्‍याला १४ दिवसांची रजा मंजूर करण्‍यात आली होती. त्‍यासाठी त्‍याने स्‍वतःच्‍या आजाराचे कारण दिले होते. त्‍यानंतर ती पुन्‍हा १४ दिवसांसाठी वाढविण्‍याची विनंती केली होती. तीदेखील मान्‍य झाली होती. आता त्‍याला पुन्‍हा ३० दिवसांची रजा मंजूर करण्‍यात आली आहे. आपल्या पत्नीची, मान्यताची प्रकृती ठीक नसल्याने ही रजा मंजूर करावी, अशी विनंती त्याने तुरुंग प्रशासनाला केली होती. ती शुक्रवारी मान्य करण्यात आली. परंतु, संजूबाबाच्या पॅरोलला ‘मान्यता’ मिळण्याच्या एक दिवस आधीच त्याची पत्नी  आर.राजकुमार या चित्रपटाच्या प्रीमिअरला गेल्याचे समोर आले. त्यामुळे तिच्या आजारपणाबद्दल आणि संजय दत्तच्या खरेपणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.