04 July 2020

News Flash

नवउद्य‘मी’ : कुटुंब रंगलंय नकाशात..

‘कोकाकोला या कंपनीला पाहिजे तसा नकाशा बनवून देण्यासाठी आम्ही एक वर्षांचा कालावधी मागितला.

देशातील अनेक कंपन्या भारतीय मॅप माय इंडियाया कंपनीची सेवा घेतात. भारतीय नकाशाला डिजिटल स्वरूप देण्यासाठी या कंपनीचे संस्थापक राकेश आणि रश्मी वर्मा यांनी मेहनत घेतली आणि देशाचा ३२ लाख ८७ हजार २६३ चौरस किमी परिसर डिजिटाइजझाला आहे.

ज्या काळात स्टार्टअप ही संकल्पनाच नव्हती, त्या काळात म्हणजे साधरणत: १९९३मध्ये कोकाकोला या कंपनीने भारतीय कंपनी ‘थम्सअप’ ही कंपनी विकत घेतली. या कंपनीच्या बाटल्या देशातील कानाकोपऱ्यात पोहोचत होत्या. पण याचा सर्व तपशील कंपनीपर्यंत पोहोचत नव्हता. हा तपशील मिळवण्यासाठी या कंपनीने त्या वेळी मोबाइलची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीची मदत घेण्याचे ठरविले. मात्र कंपनीला पाहिजे ती माहिती मिळू शकत नव्हती. हीच संधी राकेश आणि रश्मी वर्मा यांनी साधली आणि कोकाकोला, सेल्युलर वन आणि इतर कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना पाहिजे तसा डिजिटल नकाशा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. पण हे कसे शक्य होणार यावर त्या कंपन्यांनाही विश्वास नव्हता. राकेश व रश्मी दोघेही अमेरिकेत एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होते. ही कंपनी नकाशा डिजिटाइज करण्याचे काम करत असे. याच सॉफ्टवेअरचा वापर करून ते करणे शक्य असल्याचा विश्वास या दोघांना होता. या दोघांचा विश्वास पाहून कंपन्यांनी त्यांना काम दिले.

‘कोकाकोला या कंपनीला पाहिजे तसा नकाशा बनवून देण्यासाठी आम्ही एक वर्षांचा कालावधी मागितला. कंपनीने तो कालावधी मंजूर केला. त्यानुसार आम्ही काम सुरू केले. या कामासाठी आम्हाला आगाऊ  पैसे मिळाले होते. त्या पैशांची गुंतवणूक करून आम्ही हा नकाशा अधिक उच्च दर्जाचा केला आणि तो अन्य कंपन्यांनाही विकला. यात भारतीय संरक्षण विभागाचाही समावेश होता,’ असे वर्मा दाम्पत्य सांगतात.

त्यांनी २०००मध्ये ‘मॅपमायइंडिया’ या कंपनीची स्थापना केली. या कंपनीने नंतर ऑनलाइन मॅप तयार करण्यास सुरुवात केली. याचा वापर दिशादर्शक म्हणून होऊ  लागला. त्यांच्या या सेवेचा उपयोग आज ‘फ्लिट टॅक्सी किंवा अन्य वाहनांच्या ट्रॅकिंगसाठी केला जात आहे.

आज या कंपनीने संकेतस्थळ, अ‍ॅप विकसित करून अनेक कंपन्यांना त्यांना पाहिजे ती माहिती नकाशावर उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. या कंपनीची स्पर्धा थेट जागतिक कंपनी गुगलशी आहे. या कंपनीकडे विविध प्रकारची माहिती असलेले एक कोटीहून अधिक नकाशे तयार आहेत. यात देशातील वीस लाख किमीचे रस्त्यांचे जाळे, ७०६८ शहरांमधील रस्त्यांचा तपशील, ८० शहरांमधील घरांचे पत्ते, सहा लाख गावांचा तपशील आणि ८६ शहरांचा टूडी आणि थ्रीडी नकाशा आहे.

हे सर्व उभे करत असताना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. मुळात नकाशा डिजिटाइज करणे ही संकल्पनाच त्या काळात नवी होती. नकाशावर आपल्याला पाहिजे तो तपशील भरून पाहिजे ती माहिती एका क्लिकवर मिळवता येऊ  शकते, यावर कुणाचा विश्वासच बसत नव्हता. ‘आम्ही केलेल्या कामातून तो विश्वास बसू लागला आणि कंपन्यांनी आमच्याकडून त्यांना पाहिजे ते नकाशे विकसित करून घेतले. हे काम कधीही न संपणारे आहे. कारण प्रत्येक कंपनीला वेगवेगळ्या प्रकारच्या नकाशांची गरज असते. सरकारनेही आमच्याकडून सेवा घेण्यास सुरुवात केली आहे. संरक्षण विभागाने सर्वप्रथम आमच्याकडून त्यांना पाहिजे तसे नकाशे विकसित करून घेतले होते. आता कर विभागानेही आमची सेवा घेतली असून कोणत्या मालमत्तेवर किती कर आहे आणि तो कर भरला आहे की नाही याचा तपशील उपलब्ध करून देणारा नकाशा विकसित केला जात आहे. यापूर्वी स्थिर नकाशा होता, आता तो रिअल टाइम झाला आहे. म्हणजे त्यात प्रत्येक क्षणाला काही ना काही नवीन गोष्टीची भर पडत आहे,’ असे राकेश सांगतात.

अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात आल्यावर चरितार्थ चालविण्यासाठी आम्हाला उत्पन्न मिळवण्याची गरज होती. म्हणूनच पहिल्या दिवसापासून नफा मिळवणारा व्यवसायच आम्ही केला. आमचे हे व्यवसाय प्रारूप यशस्वी झाले व आम्हाला निधी उभारणीसाठी विशेष मदत घ्यावी लागली नसल्याचे राकेश सांगतात. सरकारी नकाशांचा तपशील संपल्यानंतर आम्हाला भारताचा नकाशा स्वत:हून तयार करण्याची गरज जाणवली. मग आम्ही बाइकवरून ३६० अंशात फिरणाऱ्या कॅमराची मदत घेतली आणि आमची माणसे पाठवून देशातील प्रत्येक गल्लीबोळात जाऊन माहिती गोळा करून आणली. यामुळे आमचा नकाशा हा कोणत्याही नकाशाच्या तुलनेत अधिक समृद्ध झाल्याचे राकेश आत्मविश्वासाने सांगतात.

याच काळात उपग्रह छायाचित्रप्रणाली उपलब्ध झाल्यानंतर वर्मा यांच्या व्यवसायाला अधिक मदत झाली. त्यानंतर त्यांनी देशातील पहिले संवाद साधणारे संकेतस्थळ तयार केले. त्यांच्या संकेतस्थळाला रोज पाच ते सहा हजार वापरकर्ते भेट देतात.

स्टँडफोर्ड विद्यापीठातून अभियंत्याची पदवी घेतलेला वर्मा दाम्पत्याचा मुलगा रोहन यानेही आता या व्यवसायात प्रवेश केला आहे. त्याने २००७मध्ये जीपीएसवर आधारित उपकरण विकसित करून ते वाहतूक कंपन्या व सरकारी यंत्रणांना उपलब्ध करून दिले. या यंत्रणेचा फायदा आज जवळपास सर्वच क्षेत्रातील कंपन्या घेऊ लागल्या आहेत. वस्तूची ने-आण करण्याच्या उद्योगातही ही यंत्रणा प्रभावी ठरत आहे.

‘भविष्यात आणखी विविध प्रकारचे नकाशे तयार करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे देशातील सर्व बाबी एका क्लिकवर उपलब्ध होऊ  शकणार आहे. तसेच केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही जाळे पसरवण्याचा आमचा मानस आहे,’ असे राकेश यांनी सांगितले.        (सदर समाप्त)

@nirajcpandit

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2017 3:01 am

Web Title: mapmyindia rakesh verma
Next Stories
1 नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनामुळे अनुभवविश्व समृद्ध
2 गॅलऱ्यांचा फेरा : प्रोत्साहन देण्याची संधी..
3 मूठभर लोकांच्या हातातून मुंबई महापालिकेस मुक्त करा!
Just Now!
X