मुंबई : मराठा समाजाला ओबीसी कोटय़ातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

ओबीसी महासंघाने यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्रही पाठविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावून घेण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत ओबीसी कोटय़ातून आरक्षण देऊ नये. ओबीसी समाजाची जनगणना करावी. अनेक ठिकाणी १९ टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे. अन्यथा ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी महासंघाने दिला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा तिढा कायम असतानाच आता आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक झाला आहे. आरक्षणासाठी येत्या ३१ मे रोजी धनगर समाजाने जागर करावा, असे आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.