मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी आरक्षण व इतर मागण्यांचे निवेदन घेऊन आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चा समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर विधानसभेत विविध घोषणा केल्या. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणांवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असमाधान व्यक्त करत आपली नाराजी दर्शवली. सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. एकीकडे सर्व विरोधक असमाधानी असतानाच दुसरीकडे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

मराठा आरक्षणाबाबत हे सरकार सकारात्मक दिसतंय, आता त्यांच्याकडून कृतीची अपेक्षा आहे, असा सकारात्मक सूर त्यांनी लावला. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. तुम्ही तज्ज्ञांना बोलावून न्यायालयात जा व मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी दिला. संपूर्ण विरोधी पक्ष सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत असताना राणेंचा सूर मात्र सरकारला पाठिंबा देणारा होता. त्यामुळे राणेंच्या या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

या वेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या मोर्चेकरांना सुनावले. मोर्चात येणारे काही लोक हे नकारात्मक विचारानेच येतात. परंतु, मुख्यमंत्र्यांचे उत्तर त्यांची पूर्तता करेल, असेही ते म्हणाले. कौशल्य विकासाबाबत मागील वेळीही सरकारने सांगितले होते. परंतु, त्यावर अजून काहीही झालेले नाही. पण मुख्यमंत्री पुढाकार घेतील, अशी आशा असल्याचे ते म्हणाले.