मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात राज्य शासनाला उशीर होत आहे. तसेच या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात सोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाचा बळी गेल्याने सरकारच्या निषेधार्थ  मराठा क्रांती मोर्चाकडून मंगळवारी (२४ जुलै) बंदची हाक देण्यात आली आहे. सोमवारी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात असलेले वारकरी उद्या परतीच्या वाटेवर असणार आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात आज, तर बुधवारी मुंबईत बंद पाळण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. पंढरपूर येथून परतणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मराठा मूक मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी सांगितले आहे.

आधी निश्चित करण्यात आल्याप्रमाणे बंदमुळे उद्या घराकडे निघालेल्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मुंबई, पुण्तीयाल बंद एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, बंद हा शांततेत पाळण्यात येणार असून या काळात एसटी बसेसना लक्ष्य करण्यात येऊ नये, असे आवाहनही मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीकडून आंदोलकांना करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणासाठी कानडगाव (ता. गंगापुर, औरंगाबाद) येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीत उडी घेतली होती. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तातडीने औरंगाबादच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेत बंदबाबत चर्चा सुरु केली होती.

गंगापूर तहसील कार्यालयासमोर शेकडो तरुणांचे ठिय्या व उपोषण आंदोलन सुरु आहे. मात्र, हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करत सोमवारी दुपारी मराठी समाजाच्या वतीने ‘जलसमाधी’ आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनादरम्यान ही घटना घडली.  आंदोलकांनी जलसमाधीसारखे आंदोलन करु नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. दरम्यान, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारहाण करीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी घोषणाबाजी करण्यात आली.

तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यातील मेगा भरती रोखण्यात यावी, काकासाहेब शिंदे या तरुणाला शहीद घोषित करून त्याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत देण्यात यावी तसेच कुटुंबातील एकाल सरकारी सेवेत घ्यावी अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहेत.