मराठा समाजाच्या मोच्र्याना राज्यात विविध ठिकाणी मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादाच्या पाश्र्वभूमीवर मुंबईत लवकरात लवकर मोर्चा काढावा, अशी मागणी होत असली तरी हा विषय चर्चेत राहावा या उद्देशाने मुंबईतील मोर्चा दिवाळीनंतर काढण्यात येणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपूरमध्येही मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे.

दादर येथील शिवाजी मंदिर नाटय़गृहात मुंबईतील मोर्चाचे नियोजन करण्यासाठी एक बैठक घेण्यात आली होती. त्यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून मोठय़ा प्रमाणात समाज बांधव जमले होते. प्रत्येकाला आपले विचार मांडायचे होते. पण वेळेची मर्यादा तसेच प्रत्येकाच्या भाषणाताली तोचतोचपणा लक्षात घेता आयोजकांनी आवरते घेतले आणि त्यातून काही काळ गोंधळ उडाला.

मुंबईतील मोर्चा हा विक्रमी काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नियोजन करण्याकरिता काही वेळ द्यावा, असे मतप्रवाह होता. यातूनच दिवाळीनंतर हा मोर्चा काढण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. राज्यव्यापी बैठक लवकरच मुंबईत आयोजित केली जाणार असून, सर्वांशी चर्चा करून या बैठकीत मोर्चाची तारीख जाहीर केली जाणार आहे.

कोपर्डी दुर्घटनेचा निषेध म्हणून दिवाळीत सर्वानी नवे कपडे परिधान केल्यानंतर त्यावर सरकारचा निषेध म्हणून काळ्या फितीही बांधव्यात असे आवाहन आयोजकांनी केले.

 

शहा-फडणवीस यांची चर्चा

नवी दिल्ली : महाराष्ट्रामधील मराठा समाजाच्या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यापाठोपाठ ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनाही भेटले. मराठा समाजाच्या मोर्चाना सामोरे जाण्याबाबत शहांबरोबर खलबते झाल्याचे समजते. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत विधिमंडळाचे एक दिवसीय अधिवेशन बोलावण्याचे घाटत आहे.

गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास दिल्लीत उतरल्यानंतर फडणवीस थेट ‘११, अकबर रोड’ या शहांच्या निवासस्थानी गेले. तिथे ते सुमारे दीड तास होते. सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, मराठा समाजाच्या मोर्चाचा चर्चेमध्ये मुख्य मुद्द होता. मोर्चामागचे मेंदू, त्याचे संभाव्य राजकीय परिणाम, मुंबईतील मोर्चामध्ये कायदा व सुव्यवस्था सांभाळणे आणि या मोर्चाचे अन्य घटकांमध्ये उमटलेले पडसाद यावर तपशीलवार चर्चा झाली.

‘मराठा मोर्चे हे संकट नसून संधी आहे. मराठा नेत्यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडविलेले नाहीत. पण भाजप सरकारने जर हे प्रश्न सोडविले तर त्यातून मोठी राजकीय संधी उपलब्ध होऊ  शकते,’ असे शहांनी सूचित केल्याचे समजते. त्यामुळे ‘प्रस्थापित विरुद्ध विस्थापित’ या मुद्दय़ावर जोर द्या आणि ‘विस्थापित’ असल्याची भावना बळावलेल्या गरीब-सामान्य मराठा समाजाला स्वत:कडे वळवा, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे कळते. ‘सामना’मधील व्यंगचित्राच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेकडे असलेला विस्थापित मराठा समाज भाजपकडे खेचण्याबाबतही खलबते झाली.