डोक्यावर भगवा फेटा बांधून, हातावर गोंदण वा रंगीत अक्षरे उमटवून घेण्यासाठी मोर्चेकऱ्यांमध्ये चढाओढ दिसून येत होती. तरुणांसोबत आबालवृद्धही हातावर गोंदवून घेत होते. औरंगाबाद, अहमदनगर, सांगली या भागातून आलेले तरुण, कलाकारांभोवती भायखळा राणीबाग परिसरात पाच ते सहा तरुणांभोवती मोर्चेकऱ्यांचा गराडा पडलेला दिसत होता.

बद्री म्हस्के नगरहून पाच ते सहा मित्रांना घेऊन मंगळवारी रात्री मुंबईत दाखल झाला. भायखळा परिसरात हे मित्र लेसवाले फेटे (कडक तुरा, त्याला सोनेरी किनार) बांधून देत होते. फेटय़ाच्या कापडाची खरेदी ४५ रुपये पडते. तो बांधून देण्यासाठी आम्ही वर २५ रुपये घेतो. गावाकडे लग्नसराई, राजकीय सभांमध्ये फेटे बांधतो, असे बद्रीने सांगितले.

फेटे बांधणाऱ्या बद्री आणि त्याच्या मित्रांना उसंत नव्हती. किती फेटे बांधले हे नेमके सांगता येणार नाही. बसायला वेळ नव्हता, असे बद्रीच्या मित्राने सांगितले.

चेंबूर, पांजरापोळ येथे संदीप गुरव फेटे बांधून देत होते. पांजरापोळ येथे पूर्व मुक्तमार्गावर जाता येते. बाहेरून आलेली बहुतांश वाहने या टप्प्यावर थांबून विचारपूस करत होती. त्यांना स्वयंसेवक आणि वाहतूक पोलीस सुमन नगरच्या दिशेने जाण्याच्या सूचना देत होते. शंभर रुपये घेऊन गुरव कोल्हापुरी, पुणेरी फेटा बांधून देत होते. मानखुर्दला रहातो. लग्नसराईत ऑर्डरप्रमाणे फेटे बांधण्याचे काम करतो, गुरव सांगत होते. सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी पाचशेहून अधिक फेटे बांधल्याचे सांगितले.

सांगलीहून आलेल्या रणजीत पवार नागपाडय़ात स्प्रे पेंटिंगद्वारे टॅटू काढताना दिसला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शिकणाऱ्या रणजीतने जनरेटर, काळया रंगाचा स्प्रे सोबत आणला होता. मराठा किंवा अन्य कोरलेले शब्द हातावर ठेवून स्प्रे मारत होता.

जालन्याहून मुंबईत आलेला सुलेखनकार सुरेश सूर्यवंशी मोर्चेकऱ्यांच्या हातावर मराठा, शंभूराजे आदी अक्षरे लिहिण्यात व्यग्र होता. एका हातावर सुलेखन केले की दुसरा हात पुढे येत होता. मोबाईलवरही तो सुलेखन करून देत होता. घामामुळे आपली कलाकुसर फार काळ टिकणार नाही, हे तो अत्यंत प्रामाणिकपणे सांगत होता. आजचा दिवस टिकले तरी खूप, असे म्हणत मोर्चेकरी हात त्याच्या हाती देत होते. जालन्यात स्टुडिओ आहे. गाडीच्या नंबरप्लेटपासून वेगवेगळी कामे घेतो, सुरेश सांगत होता.

औरंगाबादहून आलेला तरुण भायखळा भाजी बाजारपेठेबाहेर झेंडे विकत होता. शंभर, दीडशे ते दोनशे रुपयांना मार्चेकरी झेंडा विकत घेत होते. त्याच्याच पुढे शाईत बुडवलेला शिक्का हातावर उठवून दिला जात होता. ठिकठिकाणी एक मराठा-लाख मराठा लिहिलेल्या भगव्या टोप्या विकल्या जात होत्या.