21 February 2019

News Flash

‘नियमित’ मनस्ताप!

मोटरमनच्या ‘नियमानुसार काम’ आंदोलनामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे हाल

मोटरमननी केलेल्या आंदोलनामुळे ठाणे रेल्वेस्थानकातील फलाटांवर शुक्रवारी सायंकाळी प्रचंड गर्दी उसळली होती.

मोटरमनच्या ‘नियमानुसार काम’ आंदोलनामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे हाल

गेल्या दोन महिन्यांपासून मुसळधार पाऊस, राजकीय-सामाजिक आंदोलने, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अशा या ना त्या कारणांनी झालेली अडवणूक बिनबोभाट सोसणाऱ्या मुंबईकरांना शुक्रवारी मध्य रेल्वेच्या मोटरमननी मनस्ताप दिला. ‘नियमानुसार काम’ करण्याच्या मोटरमनच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेवरील उपनगरी गाडय़ांच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला. गाडय़ांना होणारा विलंब, अचानक रद्द झालेली गाडी आणि संथगतीने सुरू असलेली वाहतूक यामुळे दिवसभर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. फलाटांवरील गर्दी, गाडीतील धक्काबुक्की आणि रुळांवरील पायपीट यांमुळे शुक्रवारचा दिवस मुंबईकरांसाठी मनस्ताप देणारा ठरला.

मध्य रेल्वेवर कार्यरत असलेल्या ६७१ मोटरमननी शुक्रवारी ‘नियमानुसार काम’ करण्याचा इशारा देत ‘ओव्हरटाइम’ करण्यास नकार दिला. या आंदोलनामुळे दिवसभरात ५०० ते ६०० लोकल फेऱ्या रद्द होतील, अशी अटकळ होतीच. मात्र हातावर पोट असलेल्या नोकरदारांना या हालातून सुटका करून घेण्यासाठी कोणतीही संधी नव्हती. आंदोलन सुरू होताच पहाटेपासून लोकल गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले. सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत नऊ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर अन्य गाडय़ांची वाहतूकही १५ ते २० मिनिटे विलंबाने सुरू होती. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाबरोबरच सीएसएमटी ते पनवेल व ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल गाडय़ांना त्याचा मोठा फटका बसू लागला. जसजशी गर्दीची वेळ होऊ लागली, तसतशी या आंदोलनाची तीव्रता आणखी दिसू लागली.

लोकल उशिराने धावू लागल्याने कामावर जाणाऱ्यांना त्याचा मनस्ताप होऊ लागला. सकाळी ठाणे ते कुर्ला प्रवासासाठी साधारण २५ मिनिटे लागतात. याच प्रवासासाठी शुक्रवारी पाऊण ते एक तास लागत होता. सीएसएमटीपर्यंतचा प्रवास तर आणखी लांबत होता. सर्वच स्थानकांवर काही अपरिहार्य कारणास्तव लोकल फेऱ्या रद्द होत असल्याची उद्घोषणा केली जात होती. बराच वेळ लोकल अप व डाऊनला जात नसल्याने काही प्रवाशांना तर लोकल गाडय़ा उशिरा धावण्यामागील नेमके कारण समजत नव्हते. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती होती. दुपारी १२ नंतर लोकल गाडय़ांचे वेळापत्रक आणखीनच विस्कळीत होत गेले. भायखळा ते सीएसएमटीपर्यंत प्रवासासाठी दहा मिनिटे लागतात व हाच प्रवास अध्र्या ते पाऊण तासाचा होऊ लागला. त्यानंतर आणखी एक तासाने वेळापत्रकाची पुरती दैनाच उडाली. लोकल गाडय़ा या एकामागोमाग थांबू लागल्या व त्या पुढेच सरकत नसल्याने प्रवासी पुढील स्थानक गाठण्यासाठी रुळावरूनच चालणे पसंत करत होते. यात महिला प्रवासी, वृद्ध प्रवाशांचे हालच झाले. ठाणे ते नेरुळ, पनवेल या प्रवासासाठीही प्रवाशांना बराच वेळ मोजावा लागत होता.

लोकल फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला होता. मोटरमनच्या आंदोलनामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द होत असल्याची उद्घोषणा स्थानकांवर केली जात होती. तर काही लोकल फेऱ्या या उशिराने धावत होत्या. सकाळी गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेवरील मुख्य मार्ग, हार्बर, ट्रान्स हार्बरवरील ६१ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. सायंकाळपर्यंत ७९ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. मात्र एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार १५० हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.

पोलिसांचा बंदोबस्त

मोटरमन आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याने दुपारनंतर सर्व रेल्वे स्थानकांतील लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचे मनुष्यबळ वाढविण्यात आले. प्रवाशांचा उद्रेक होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय योजण्यात आले. तर सीएसएमटी येथील मोटरमन लॉबीसमोर मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.

First Published on August 11, 2018 12:41 am

Web Title: maratha kranti morcha mumbai railway