चव्हाण, मुंडे, खोतकर यांची मागणी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या या समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, अशी मागणी राज्य सरकारमधील राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर, तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतंत्रपणे पत्रे पाठविली आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी केली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणासाठी आंदोलनात सहभागी झालेले तरुण होतकरू व बेरोजगारांनी ग्रासलेले आहेत. त्यांच्या भवितव्याचा विचार करून त्यांच्यावर कोणत्याही कलमाखाली गुन्हे दाखल करू नयेत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची राज्य सरकारची कारवाई सुडाची असल्याचा आरोप करून ही कारवाई तत्काळ थांबवावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.

जे सरकार मराठा तरुणांचे आयुष्य घडविण्यास असमर्थ आहे, त्या सरकारला निरपराध तरुणांवर खोटे आरोप ठेवून गंभीर गुन्ह्य़ात गोवण्याचे अधिकार कुणी दिले, असा सवाल त्यांनी केला आहे. मराठा आंदोलनात युवक व महिलांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, हे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत आणि पोलिसांनी सुरू केलेले अटकसत्र त्वरित थांबवावे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.