तिकीटवाटपात मराठा उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता

राज्यात इतरत्र निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चानंतर मुंबईतही मराठय़ांचा महामोर्चा काढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. पण, या तयारीच्या निमित्ताने महानगरीतील मराठय़ांच्या संख्यात्मक ताकदीचाही अंदाज येऊ लागल्याने मुंबईच्या महापालिका निवडणुकीत ‘मराठा कार्ड’ वापरण्याच्या दृष्टीनेही काही उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे. प्रत्यक्ष मतदानात याचे चित्र उमटण्याबाबत शंका असली तरी तिकीटवाटप प्रक्रियेत मराठा कार्ड हा घटक निर्णायक ठरेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

मुंबईत परळ-लालबाग, घाटकोपर, बोरिवली, मालाड आदी म्हणावे असे अनेक भाग मराठाबहुल आहेत. परंतु, व्होट बँकेचे गणित कायमच भाषा, धर्म यावर ठरत आले आहे. मुंबईच्या बाबतीत व्होट बँकेचा विचार, कायम मराठी भाषक, उत्तर भारतीय, गुजराती, मुस्लीम-बौद्ध असा होत आला आहे. परंतु, मराठा, ब्राह्मण, ओबीसीतील अठरापगड जाती अशी जातनिहाय ‘व्होट बँक’ मुंबईत तयार झाली नाही. नाही म्हणायला स्थानिक पातळीवर पक्ष जातनिहाय मतांची दखल घेत होते. परंतु, याचे चित्र प्रत्यक्ष मतदानात उमटत नव्हते. त्यातून खुद्द मराठय़ांमध्येच हा कोकणी, तो देशावरचा असा भेदभाव असल्याने संख्येने अधिक असूनही मराठय़ांची व्होट बँक मुंबईत तयार झाली नाही. परंतु, कोपर्डी घटनेनंतर हे चित्र पालटले आहे. सध्या मुंबईतही मराठय़ांच्या महामोर्चा काढण्याच्या दृष्टीने जोरदार बैठका सुरू झाल्या आहेत. त्या निमित्ताने पालिका निवडणुकीत पक्षाकडून तिकीट खिशात टाकू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे ‘मराठा कार्ड’ गवसले आहे. या बैठकांच्या व्यासपीठावरून नसले तरी दबक्या आवाजात यंदाच्या निवडणुकीत ‘मराठा कार्ड’ कसे चालेल याची चाचपणी नेतेमंडळी करू लागली आहेत. महत्त्वाचे म्हणजे सत्ताधारी भाजपवगळता इतर सर्व पक्षांचे नेते या बैठकांमध्ये सहभागी आहेत. त्यात जाहीर भूमिकेतून जातीपातीचे राजकारण नाकारणाऱ्या शिवसेना नेत्यांचा जसा सहभाग आहे, तसाच तो जातनिहाय आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेतील नेत्यांचाही आहे!

यंदाच्या पालिका निवडणुकीतील मराठा कार्डचे महत्त्व ‘मराठा क्रांती मोर्चा’चे उत्तर मुंबई समन्वयक समितीचे निमंत्रक सदानंद चव्हाण यांनीही मान्य केले. इतक्या मोठय़ा संख्येने मराठा कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असा भेदभाव विसरून एकत्र येत असेल तर त्याचे प्रतिबिंब निवडणुकीत उमटणार नाही का, असा सूचक प्रश्न त्यांनी केला.

हा विचार पुढे नेत मुंबईतील अनेक भागातील मराठा संख्याबळाचा अदमास घेत या ठिकाणी ‘मराठा कार्ड’ कसे चालेल याचा अभ्यास आता नेतेमंडळी करू लागली आहेत. उदाहरणार्थ, बोरिवलीत चारकोप-गोराई, मालाडमध्ये कुरार व्हिलेज, जोगेश्वरीत मजासवाडी, घाटकोपरमध्ये भटवाडी असे इतर अनेक भाग आहेत जे मराठाबहुल आहेत.

चारकोपसारख्या ठिकाणी ६० हजार मतांमध्ये साधारणपणे १५ ते २० हजार मते मराठय़ांची आहेत. आतापर्यंत ही मते त्या त्या वेळच्या निवडणुकीच्या मुद्दय़ांवरून विविध पक्षांमध्ये विभागली जात. गेल्या वेळेस मराठीच्या मुद्दय़ावरून ही मते मनसेच्या पारडय़ात पडली होती. परंतु, मराठीपेक्षा ‘मराठा’ हा मुद्दा महत्त्वाचा ठरला तर ही मते एकगठ्ठा खिशात टाकू शकणाऱ्या मराठा नेत्याला मिळू शकतील, असा अंदाज शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने वर्तवला.

मतदानात चित्र उमटेल?

सध्या तरी मोर्चाच्या निमित्ताने मुंबईत होणाऱ्या बैठकांमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इतकेच काय, तर मनसेच्याही मराठा नेत्यांचा समावेश आहे. परंतु, या बैठकांच्या निमित्ताने कोण किती मराठय़ांना जमा करते यावर आता संबंधित उमेदवाराचीही ताकद ठरणार आहे. याचा त्यांना तिकीटवाटपाच्या वेळेस निश्चित फायदा होईल. मात्र, प्रत्यक्ष मतदानात हे चित्र कायम राहील का याबाबत शंका आहे, असे निरीक्षण ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ-जोशी यांनी नोंदविले.