मराठा संघटनेचा इशारा

मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने आरक्षणासह इतर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप करून, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला मुंबईत घेराव घालण्याचा निर्धार महाराष्ट्र सकल मराठा संघाने पक्का केला आहे. राज्यभरातील २९ विविध जिल्ह्य़ांतील समन्वयकांच्या राज्यस्तरित बैठकीचे आयोजन पनवेल येथील के. व्ही. कन्या विद्यालयाच्या सभागृहात केले होते. तेथे हा निर्धार एकमुखाने व्यक्त करण्यात आला. या बैठकीत मराठा समाजाच्या विविध प्रतिनिधींनी सरकारविषयी संताप व्यक्त केला. मराठा समाजाने राज्यव्यापी आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले, मात्र सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे या बैठकीत सरकारच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. तसेच १० फेब्रुवारीपर्यंत समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्यास ११ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय दुसरी बैठक आयोजित करून त्या बैठकीमध्ये तीव्र आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येईल. समायोजनाअंतर्गत सुमारे १३०० बंद करण्यात आल्या आहेत. त्याचेही पडसाद बैठकीत उमटले. या शाळा सरकारने पुन्हा सुरू कराव्यात, असा ठराव या बैठकीत विविध जिल्ह्य़ाच्या प्रतिनिधींनी मांडला.