मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी राज्यभरात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे. मात्र, यादिवशी नवी मुंबईत कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्यात येणार नाही, असा निर्णय सकल मराठा समाज नवी मुंबई समन्वय समितीने घेतला आहे.

२५ जुलै रोजी काढलेल्या मोर्चाला नवी मुंबईत हिंसक वळण लागले होते, आणि त्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा असे होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नवी मुंबई ही आगरी समाजाच्या त्यागावर उभी असून आगरी कोळी व आमचे अतिशय चांगले संबंध आहेत, पण त्यामध्ये तेढ निर्माण करण्यात आला. मराठा समाजातील लोकांचे आंदोलन समाजकंटक लोकांनी चिघळवले. सुदैवाने हत्येच्या घटनेनंतर सर्वांनी शांतता बाळगल्याने अघटीत काही घडले नाही. तरीही नवी मुंबईमध्ये संवेदनशील वातावरण असल्याने येथे संप करणार नाही. असा निर्णय सकल मराठा समाज नवी मुंबई समन्वय समितीने घेतला आहे.