आज सकाळपासून मराठा क्रांती मूक मोर्चामुळे मुंबईतील वातावरण भगवेमय झाले आहे. सकाळी अकरा वाजता भायखळातील जिजामाता उद्यानापासून निघालेला हा मोर्चा सध्या मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. थोड्याचवेळात हा मोर्चा आझाद मैदानात पोहचेल. या मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाल्याने खूप मोठ्या अंतरापर्यंत भगवा जनसागर उसळलेला पाहायला मिळत होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील झाले असून मोर्चाच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा मोर्चा भायखळ्यातून निघाला तेव्हा त्याचे शेवटचे टोक दादरपर्यंत होते. एकूणच सरकारला या विराट मोर्चाची दखल घेणे भाग पडणार आहे. मराठा मोर्चाच्या या संपूर्ण प्रवासाचे ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने सविस्तर कव्हरेज केले आहे.

मोर्चाच्या प्रथेनुसार महिला आणि तरुणींकडे मोर्चाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. थोड्याचवेळात हे मोर्चेकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन देतील. मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी राज्यात आत्तापर्यंत ५७ ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  त्यानंतर मुंबईतील आजचा मुंबईतील मोर्चा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना हा मोर्चा निघत असून सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. सर्वपक्षीय नेते या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता असून मोर्चाला राजकीय रंग येणार नाही यावर आयोजकांनी भर दिला आहे. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या परिसरात दाखल झाला तेव्हाची काही दृश्ये.

[jwplayer qSkEaoqJ]

मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी आयोजक, प्रशासन आणि महापालिकेतर्फे व्यवस्था करण्यात आली होती. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेटस्, रुग्णवाहिकांसह डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते.

[jwplayer 7gVThjyn-1o30kmL6]