01 December 2020

News Flash

‘मराठा आरक्षण : घटनापीठ स्थापण्याबाबत लवकरच निर्णय’

राज्य सरकारच्या विनंतीनंतर न्यायालयाचे सूतोवाच

(संग्रहित छायाचित्र)

 

मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ  स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील व ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधिशांनी हे सूतोवाच केल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील मराठा (एसईबीसी) प्रवर्गाच्या हजारो विद्यार्थ्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती रोहतगी यांनी सोमवारी सरन्यायाधिशांना केली. राज्य शासनाने यापूर्वी दोन वेळा म्हणजे ७ ऑक्टोबर आणि २८ ऑक्टोबर रोजी लेखी अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याचेही रोहतगी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर या अर्जाबाबत लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सरन्यायाधिशांनी सांगितले.

घटनापीठाची तातडीने स्थापन करून  मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्याचा लेखी अर्ज यापूर्वी दोन वेळा केलेला असला तरी सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी याच मागणीचा लेखी अर्ज तिसऱ्यांदा सादर करण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

मराठा विरुद्ध ओबीसी वादासाठी षड्यंत्र

राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा  वाद निर्माण करण्यासाठी  काही राजकीय पक्षांनी षड्यंत्र रचले आहे, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. ते म्हणाले की, मराठा समाजाचे आरक्षण हे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलेले वेगळे आरक्षण आहे. आधीच्या सरकारची हीच भूमिका होती व आमच्या सरकारचीही तीच भूमिका आहे. तरीही काही लोक गैरसमज पसरवत आहेत. ही मागणी करणारे लोक कोणत्या पक्षाचे लोक आहेत, याचे संशोधन केले तर हे षड्यंत्र लक्षात येते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक जण प्रामाणिकपणे काम करत आहेत. परंतु, काही मंडळी आता या आंदोलनात घुसली असून, राजकीय हेतू ठेवून हा प्रकार सुरू आहे का, याचा शोध घेतला पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:29 am

Web Title: maratha reservation decision on establishment of constituent assembly soon abn 97
Next Stories
1 चामडी वस्तूंच्या बाजारपेठेत अर्थअंधार
2 राज्याकडे गुंतवणुकीचा ओघ
3 मुखपट्टी नसेल तर दंड
Just Now!
X