राज्यात कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करणारे बहुतांशी शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत. उसाला योग्य भाव मिळावा म्हणून रस्त्यावर उतरणाऱ्या ऊस उत्पादकांमध्ये जास्त उत्पादक मराठा आहेत. त्यामुळे सगळेच मराठा श्रीमंत व राजे नसून त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. तेव्हा सरकारने इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता त्वरित २५ टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पनवेल येथील कर्नाळा स्पोर्टस अकॅडमीच्या मैदानावर रविवारी पुन्हा एकदा आरक्षणाचा एल्गार करण्याचे ठरविले आहे.
कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्य़ांतील मराठा बांधवांना या इशारा मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दुसऱ्यांना आरक्षण देताना मराठा समाजाने कधीही विरोध केला नाही, मग आम्हाला आरक्षण देण्याच्या मागणीवर विरोध का होत आहे, असा सवाल उपस्थित करून मेटे यांनी प्रकाश आंबेडकर, गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस एकीकडे मराठा आरक्षणाला पाठिंबा देत असताना त्यांचे नेते मुंडे मात्र जाहीर सभांमधून आरक्षणाला विरोध करीत आहेत. भाजपचा हा दुटप्पीपणा असून तो भाजपला परवडणारा नाही, अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली. शासनाने या विषयावर समिती तर स्थापन केली आहे, पण त्यात चालढकलपणा केला जात आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  या मागणीवर ढिम्म आहेत. सरकारची हीच भूमिका राहणार असेल तर सत्तेवर बसविणारा मराठा समाज येत्या निवडणुकीत सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मेटे यांनी दिला. त्यासाठी आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षाच्या विरोधात मतदान करण्याचा प्रचार केला जाणार आहे. शासनाने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीला यानंतर मुदतवाढ देण्यात येऊ नये, अशी मागणी येत्या नागपूर अधिवेशनात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी संध्याकाळी चार वाजता पनवेलमध्ये होणाऱ्या इशारा महामेळाव्याला कोणत्याही मराठा नेत्याला किंवा मंत्र्याला आमंत्रित करण्यात आलेले नाही. कोकणातून सुमारे दहा हजार मराठा या मेळाव्याला येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.