चौकशी करण्याची विनोद तावडे यांची विधान परिषदेत घोषणा

मराठा आरक्षण अध्यादेशाला स्थगिती देण्याच्या आधीच्या कालावधीत शैक्षणिक व सामाजिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना गुणवत्तेवर नियुक्त्या देण्यास जाणीवपूर्वक नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.

या संदर्भात विनायक मेटे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मराठा समाजातील शैक्षणिक व सामाजिक दृष्टय़ा मागास प्रवर्गातील (इएसबीसी) उमेदवारांना व विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये १६ टक्के आरक्षण लागू करण्याचा अध्यादेश जारी करण्यात आला होता. त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

मात्र, स्थगितीच्या आधीच्या कालावधीतील इएसबीसी विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना व शासकीय सेवेत निवड झालेल्या उमेदवारांना संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु लातूर, परभणी व अमरावती जिल्ह्यांत काही उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. तथापि, राज्यात इतर जिल्ह्यंमधील सुमारे १७०० ते १८०० उमेदवारांवर अन्याय झाल्याचे विनायक मेटे यांनी या वेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

शासनाचे आदेश असताना न्यायालयाच्या स्थगितीचे कारण पुढे करुन काही अधिकारी जाणूनबुजून नियुक्त्या देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाची स्थगिती असली, तरी ईएसबीसीमधील उमेदवारांना गुणवत्तेनुसार शासकीय सेवेमध्ये नियुक्त्या देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली.

शिक्षण मंत्री तावडे यांनी सांगितले की, न्यायालयाच्या स्थगितीपूर्वीचे इएसबीसी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला व शासकीय सेवेत निवड होऊन नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना संरक्षण देण्यात आले आहे. आता शासकीय सेवेत निवड झाली आहे, परंतु नियुक्तीपत्रे मिळाली नाहीत, त्यांचा हा प्रश्न आहे. त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, असे विनोद तावडे यांनी या वेळी सांगितले.

न्यायालयाच्या स्थगितीचे कारण सांगून नियुक्त्या देण्याबाबत अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई केली जाईल, असे आश्वासन तावडे यांनी दिले.  उपसभापती वसंत डावखरे यांनी या प्रश्नावर सभागृहात स्वतंत्र चर्चा घ्यावी, अशी सूचना केली. विनोद तावडे त्याला होकार दिला.

मात्र, त्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सदस्यांनी सभात्याग केला