मुंबई : राज्य सरकाराने १५ नोव्हेंबपर्यंत मराठा आरक्षण लागू न केल्यास २५ नोव्हेंबरपासून सर्व आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर शांततेत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने शुक्रवारी दिला.

मराठा आरक्षण मोर्चातून सरकारने फोडलेल्या कार्यकर्त्यांनी यापुढे आंदोलन केल्यास त्यांना धडा शिकवणार असल्याचेही ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी यापुढे राज्यात सर्वव्यापी एकच आंदोलन होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणासंदर्भात वैधानिक कार्यवाही नोव्हेंबपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मुंबई उच्च न्यायालयानेही १५ नोव्हेंबपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. मात्र, यासंदर्भात राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नसल्याचा आरोप करीत मराठा क्रांती ठोक मोर्चाने पुन्हा ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत मराठा समाजाचे नेते हालचाल करत नसल्याने त्यांच्यासह सर्वपक्षीय आमदार-खासदारांच्या घराबाहेर २५ नोव्हेंबरपासून ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती ठोक मोर्चाचे अप्पासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘दुष्काळ जाहीर करा’

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने राज्य सरकाराने दुष्काळ  जाहीर करावा, अशी नवी मागणी ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. दुष्काळ जाहीर न केल्यास शेतक ऱ्यांनाही ठिय्या आंदोलनात सामावून घेणार असल्याची माहिती देण्यात आली.

सागरी स्मारकाला पाठिंबा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला मराठा समाजाचा पाठिंबा असून छत्रपती शिवाजी महाराज राज्यासह देशासाठी स्फूर्तिदायक असल्याने त्यांचे स्मारक विनाअडथळा उभे राहणे आवश्यक असल्याची भूमिका ठोक मोर्चाचे अप्पासाहेब पाटील यांनी मांडली.