मराठा आरक्षणावर पुढच्या दोन ते तीन दिवसात सरकारकडून सकारात्मक हालचाली होतील. लवकरच या विषयावर पडदा पडेल असा दावा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार नारायण राणे यांनी केला आहे. बुधवारी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
पुढच्या दोन ते तीन दिवसात मराठा आरक्षणावर सकारात्मक हालचाली होतील असे राणे म्हणाले. प्रश्न सुटण्यासारखा आहे काहीही कठिण नाही. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय समितीची परवानगी आवश्यक आहे तसेच न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. यावर लवकरच पडदा पडेल असा दावा राणे यांनी केला. आरक्षणासह मराठा समाजाच्या अन्य मागण्या मार्गी लावण्यासंदर्भात नारायण राणे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
नारायण राणे भाजपामध्ये नसले तरी त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना नारायण राणे यांच्याकडे मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भातला अहवाल तयार करण्याची जबाबदारी होती. नारायण राणे यांनी सुरुवातीपासून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही मागणी लावून धरली आहे.
मागच्यावर्षी सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करुन राज्यात पुन्हा मंत्रिपद मिळवण्याचा जोरदार प्रयत्न केले. पण भाजपाने त्यांना झुलवत ठेवले. अखेरीस भाजपामध्ये प्रवेश मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली व भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला. भाजपाच्या पाठिंब्याने ते राज्यसभेतून खासदारही झाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 25, 2018 7:42 pm