मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिलेला असताना आता आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देत असल्याचे भाऊसाहेबांनी सांगितले आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याची मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी ई-मेलद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला आहे.

दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर, राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले. आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

राज्य सरकारने मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले. विशेषत: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णत: कटिबद्ध आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यासंदर्भातील कायदा तयार केला. परंतू मा. उच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती दिली. त्यानंतर राज्य सरकारने मा. सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तेथे राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.