मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान यवतमाळमधील रस्त्यावर एक वेगळे दृश्य पाहायला मिळाले. मराठा आंदोलकांनी आज महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागात रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक रोखून धरली. त्याचवेळी विदर्भ आणि मराठवाडयाला जोडणाऱ्या मार्गावर रास्ता रोकोमुळे अडकून पडलेले नागरीक, वाहन चालकांना जेवणाचा घास भरवून आपल्यातल्या माणुसकीचेही दर्शन घडवले.

विदर्भ आणि मराठवाडयाला जोडणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर मार्ग आंदोलकांनी सकाळी सात वाजल्यापासून रोखून धरला होता. पण त्याचवेळी या मार्गावर अडकून पडलेले प्रवासी, वाहन चालकांना आंदोलकांनी जेवणही वाढले.

राज्यातील काही भागात रस्त्यावर टायर जाळणे, दगडफेक असा हिंसाचार दिसला तर याउलट नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावर जेवणाची पंगत बसलेली पाहायला मिळाली. या मार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. या वाहनांमध्ये अडकून पडलेले प्रवासी, ट्रक चालक यांना मराठा आंदोलकांकडून जेवण वाढण्यात आले.