सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाने मुंबईसह, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुकारलेल्या बंद दरम्यान काही भागात हिंसाचार झाला. यावेळी कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संभाळताना सात पोलीस जखमी झाले. आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत पोलीस जखमी झाले. सायन-पनवेल मार्गावर कळंबोली येथे मोठा हिंसाचार झाला.

संतप्त जमावाने पोलिसांच्या दोन गाडया पेटवून दिल्या. हिंसक झालेल्या या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या. यावेळी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाले. साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंट चौकात झालेल्या दगडफेकीत पोलिस अधिक्षक संदीप पाटील जखमी झाले. ठाण्यात नितीन कंपनीजवळ जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. या दगडफेकीत चार पोलीस जखमी झाले.दुपारी नितीन कंपनीजवळ आंदोलनाला हिंसक वळण लागले.

जवळपास १०० लोकांच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत ४ पोलीस जखमी झाले असून यात एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. आंदोलकांनी सुरुवातीला पोलीस उपायुक्ताच्या गाडीला लक्ष्य केले. यानंतर हे आंदोलन चिघळत गेले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या ८ नळकांड्या फोडल्या.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक बनले असून, त्यांनी टायर पेटवून रास्ता रोको केला. परिस्थिती नियंत्रणात आणत असताना यावेळी जमावाकडून दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले असून, जमावाला पंगावण्यासाठी पोलिसांकडून ५ टियर गॅस फोडण्यात आले.