मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मंगळवारी महाराष्ट्र बंद आणि बुधवारी मुंबई बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला काही ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे मराठा मोर्चा समन्वयक, सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर अागपाखड केल्याचे दिसून आले. या दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टोमणा लगावला आहे.
मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी ‘मराठा आरक्षणा’बाबत नक्की काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी भाजपचे सरकार पुढे असते. त्यामुळे वाटल्यास ‘आम्ही आरक्षण दिले होते’ असा डांगोरा पिटून त्याचेही श्रेय घ्या. पण महाराष्ट्राची आग शांत करा आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा, असा टोला ‘सामना’तून लगावण्यात आला आहे.
एरवी सर्वच प्रकरणांत मुख्यमंत्री फडणवीस हे ‘सब कुछ मैं’च्या भूमिकेत असतात. मग मोर्चाच्या कालावधीत ते कोठे होते? त्यांच्या सरकारने या काळात का पलायन केले, असा सवाालही करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आता आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार आहेत. मग परळीमध्ये आठवडाभरापासून मराठा आंदोलक आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करत असताना मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला हवी होती. तसे झाले असते, तर ना महाराष्ट्र पेटला असता, ना काकासाहेब शिंदेंचे बलिदान झाले असते आणि ना नंतरचा आगडोंब उसळला असता… असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
आंदोलकांच्या भावना किती तीव्र आहेत हे कालच्या ‘बंद’ प्रकरणात दिसले. मराठा क्रांतीचे लाखो-लाखोंचे मोर्चे शांततेत पार पडले. पण ‘बंद’मध्ये काही ठिकाणी हिंसाचार घडला. मंत्रालयास व भाजप मंत्र्यांच्या घरांभोवती पोलीस छावणीचे स्वरूप आले. मागच्या चोवीस तासांत सरकारने जणू पळ काढला होता. जेवढ्या लवकर शांतता स्थापन होईल तेवढे सगळ्यांच्या दृष्टीने बरे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 5:54 am