आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने पुकारलेला बंद मागे घेतला असला तरी कळंबोलीतील तणाव अजून निवळलेला नाही. कळंबोलीत जमावाने पुन्हा एकदा रास्ता रोकोचा प्रयत्न केला. अचानक चालून आलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांची मोठी कुमक या भागात असून पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरुन हटवले असून वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे.

काही वेळापूर्वीच कळंबोलीतील रास्ता रोको मागे घेण्यात आला होता. तब्बल सहा तास आंदोलकांनी हा रस्ता रोखून धरला होता. मराठा समाजाने पुकारलेल्या बंदचे तीव्र पडसाद कळंबोलीत उमटलेले पाहायला मिळाले. कळंबोलीतील रास्ता रोकोमुळे पुण्याकडे व कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प होती.

कळंबोलीत जमावाने पोलिसांच्या दोन गाडया पेटवून दिल्या. हिंसक झालेल्या या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या.