मराठी चित्रपटांमध्ये दुय्यम स्वरूपाच्या भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्रीवर दिग्दर्शकाच्या मित्रांकडूनच सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘लहानपण’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ही अभिनेत्री गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबाद येथे वास्तव्याला होती. ही २१ वर्षीय पीडित अभिनेत्री मुंबईची ती रविवारी दिग्दर्शकाच्या मित्राकडून मानधन घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याने या अभिनेत्रीला औरंगाबदपासून ५६ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पैठण येथे नेऊन अन्य चार मित्रांसह तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या निरीक्षक कांचन कुमार चाटे यांनी दिली.
या अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, औरंगाबादमधील स्थानिक दिग्दर्शक आनंद मगधे याने त्याचा मित्र गोविंद चितलगे याला आपल्या चित्रपटासाठी अभिनेत्री शोधण्यास सांगितले होते. त्यानंतर गोविंद चितलगेने या अभिनेत्रीचे नाव सुचवले होते. गेल्या दोन महिन्यांपासून येथील अंबड तालुक्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून तिला कोणतेही मानधन मिळालेले नव्हते. या अभिनेत्रीने याविषयी गोविंद चितलगेला विचारणा केली तेव्हा त्याने तिला औरंगाबादला बोलावून घेतले. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.