News Flash

ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचं निधन

वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचं निधन झालं आहे. गोट्या, बे दुणे तीन, हसवणूक, गंगुबाई नॉन मॅट्रीक या मालिकांमधून ते घराघरात पोहचले होते. इतकंच नाही तर हसवाफसवी, वस्त्रहरण यांसारख्या सुमारे ३० नाटकांमधून त्यांनी कामं केली होती. आज त्यांचं मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं. ‘वात्रट मेले’ या नाटकातली त्यांची भूमिका विशेष गाजली. गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८३ वर्षांचे होते. भाकरी आणि फूल, कॉमेडी डॉट.कॉम या मालिकांमधूनही त्यांनी कामं केली होती आणि अमाप लोकप्रियता मिळवली होती.

दिलीप प्रभावळकर यांच्या हसवाफसवी या नाटकातली त्यांची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली. एवढंच नाही तर वस्त्रहरण या नाटकातली त्यांची भूमिकाही गाजली. कथास्तु, हसवणूक, कॉमेडी डॉट. कॉम, चला बनू करोडपती, गंगुबाई नॉन मॅट्रीक या टीव्ही मालिकांमधूनही ते घराघरात पोहचले होते. काचेचा चंद्र, हिमालयाची सावली, कस्तुरी मृग, प्रेमा तुझा रंग कसा, लेकुरे उदंड झाली या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करत असताना त्यांनी आपला नाटकांमध्ये भूमिका करण्याचा छंदही जोपासला होता. केला तुका आणि झाला माका या नाटकातील अप्पा मास्तर आणि वस्त्रहरण या नाटकातील जोशी मास्तर अशा त्यांच्या भूमिकाही लोकप्रिय ठरल्या. रंगभूमी आणि मालिका विश्वात आपला वेगळा ठसा उमटवलेले लीलाधर कांबळी आज काळाच्या पडद्याआड गेले.

प्रेमा तुझा रंग कसा या वसंत कानेटकर लिखित नाटकातून लीलाधर कांबळी यांनी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. बुकिंग क्लार्क, दौऱ्यांचं व्यवस्थापन, प्रॉम्पटिंग करणं अशाही जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पेलल्या. राज्य सरकारकडून नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. फनी थिंग कॉल्ड लव्ह या भरत दाभोळकर यांच्या इंग्रजी नाटकातही लीलाधर कांबळी यांनी काम केलं होतं. सिंहासन, हल्लागुला, रंगत संगत, आई पाहिजे, सारेच सज्जन, जिगर, बरखा सातारकर, प्राण जाये पर शान न जाये, श्वास, सविता बानो, हंगामा, वनरुम किचन, सुकन्या या सिनेमांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 11:28 pm

Web Title: marathi actor liladhar kambli passes away due cancer scj 81
Next Stories
1 मुंबईत १०० व्यक्तींमागे २८ जण करोना पॉझिटिव्ह; फडणवीसांनी व्यक्त केली चिंता
2 मुंबई विमानतळाच्या कामात गैरव्यवहार; ‘जीव्हीके’चे अध्यक्ष रेड्डी व संजीव रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा
3 लालबागचा राजा मंडळाची ८७ वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये, आशिष शेलारांचं आवाहन
Just Now!
X