अभिनेते मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, अक्षय कुमार यांच्यापाठोपाठ आता अभिनेते प्रशांत दामले यांनीही दुष्काळग्रस्त शेतकऱयांना मदतीचा हात दिला आहे. प्रशांत दामले यांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला असून जलयुक्त शिवार योजनेसाठी ही मदत वापरली जाणार आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ट्विटअर अकाऊंटवरून दिली आहे. दामले यांनी केलेल्या मदतीचे मुख्यमंत्र्यांनी आभार देखील व्यक्त केले आहेत.
दुष्काळाच्या संकटाशी सामना करणाऱया बळीराजाला पुन्हा उभारी घेण्यासाठी चित्रपट व क्रीडा क्षेत्रातील मंडळी सरसावली आहेत. अभिनेते मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांनी नाम संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत करायला सुरूवात केली आहे. त्यानंतर मदतीचा ओघ वाढायला सुरूवात झाली असून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, आमिर खान यांनीही पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जलयुक्त शिवार योजनेला मदत म्हणून धनादेश सुपूर्द केला. मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही पाच लाखांची मदत देऊ केली. या यादीत आता प्रशांत दामलेंचाही समावेश झाला आहे.