वांद्रे स्थानकावर मंगळवारी दुपारी गाडी बराच वेळ रेंगाळली आणि प्रवाशांच्या मनात भीतीची पाल चुकचुकली. पुढच्या संकटाची अस्वस्थ जाणीव प्रवाशांच्या चेहऱ्यावर उमटली. साऱ्या नजरा खिडकीतून दिसणाऱ्या आभाळाच्या तुकडय़ाकडे लागल्या. संकट गडद होत आहे, हे गाडीच्या गतीवरूनच समजत होते. कसेबसे माहीम स्थानक गाठले आणि गाडी जागेवरच थांबली.  मग ‘२६ जुलै’चे अनुभवकथन सुरू झाले, आणि भेदरलेल्या काहींनी गाडीतून उतरून परतीच्या गाडीचे दुसरे फलाट गाठले. उरल्यासुरल्या भयभीत प्रवाशांना घेऊन गाडी दादरच्या दिशेने सरकली. माटुंगा स्थानकावरच पुढच्या संकटाचा अंदाज आला होता. क्षणाक्षणाला रुळांवरील पाण्याची पातळी उंचावत होती. तरीही गाडी सरकत होती. दादर, एल्फिन्स्टन रोड, लोअर परळ पार पडले आणि महालक्ष्मीनंतर पुन्हा गाडी कमालीची मंदावली. चर्नी रोड आणि मरीन ड्राइव्हच्या मध्ये गाडीने धीर सोडला. तब्बल तासभर एकाच जागी अनेक गाडय़ा उभ्या होत्या. पुढे आणि मागेही गाडय़ांची रांग होती. चर्चगेटचे फलाट मोकळे मिळेपर्यंत गाडी जागेवरून हलणार नाही, आणि उत्तर मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ा सुटतच नव्हत्या. त्यामुळे चर्चगेटचे फलाट रिकामे होण्याची आशा मावळलेल्या अनेकांनी अखेर गाडीतून उडय़ा मारल्या आणि पायपीट सुरू केली.. तब्बल तासानंतर गाडी हलली आणि चर्चगेट स्थानकावर धापा टाकत विसावली. बोरीवली ते चर्चगेट ‘डबल फास्ट’ने तब्बल अडीच तासांनंतर पल्ला गाठला. विलंबाचा नवा इतिहास कालच्या पावसाने घडविला..

चर्चगेट स्थानकावर भर दुपारी परतीच्या प्रवाशांची प्रचंड गर्दी माजली होती, चारही फलाटांवर गाडय़ा उभ्या होत्या. सारे इंडिकेटर मृतवत पडले होते. कोणती गाडी कधी सुटणार, कुणालाच कल्पना नव्हती. परतणाऱ्या प्रवाशांच्या अवघ्या गर्दीवर चिंता दाटली होती. गाडय़ा खचाखच भरून गेल्या. एखादी गाडी सुटली, की गर्दीतून गजर व्हायचा.. ‘गणपती बाप्पा मोरया!’ दुपारनंतर गाडय़ांची ये-जा बंदच झाली, आणि गर्दी हतबल झाली. महिला, मुले, वृद्ध, अपंगांचे तर अतोनात हाल सुरू झाले..

अस्वस्थता, बेचैनी आणि भीतीचे संमिश्र सावट साथीसारखे सर्वत्र पसरले होते. गाडय़ा बंद असतानाही चर्चगेट स्थानकावरील गर्दी क्षणाक्षणाला वाढतच होती. रात्र चढत गेली, पावसाचा जोर ओसरत गेला, आणि ताटकळलेल्या प्रवाशांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यांवर आशेची पालवी उमटू लागली. महालक्ष्मी ते माहीमपर्यंतच्या रेल्वेमार्गावर साठलेले गुडघाभर पाणी हटविण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नांची शर्थ करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या, आणि गर्दीतील आबालवृद्ध आश्वस्त होऊ लागले. रात्री ११ वाजून ५८ मिनिटांनी एका फलाटावरचा इंडिकेटर अचानक झळकला, आणि अवघ्या गर्दीने पुन्हा गजर केला.. गणपती बाप्पा मोरया.

विरारकडे जाणारी ती गाडी पुढच्याच क्षणाला खचाखच भरून गेली, आणि फलाटावर मागे उरलेल्या गर्दीतील प्रत्येक चेहरा पुन्हा हिरमुसला झाला. पण गाडय़ा चालणार अशी आशा आता वाढली होती. ती गाडी सुटली, आणि पुढच्या काही सेकंदांतच नव्या गाडीचा इंडिकेटर झळकला. पुन्हा गणपती बाप्पाचा गजर झाला, गाडी भरली, आणि अध्र्या-पाऊण तासानंतर तिनेही गणपती बाप्पाच्या गजरात चर्चगेट स्थानक सोडले. नंतर पाऊण तासाने तिसरी गाडी लागली.. गर्दीला मायेने सामावून घेऊन ती विरारच्या दिशेने रवाना झाली. उरलेली गर्दी फलाटावर असतानाच बोरीवलीकडे जाणारी गाडी लागली. ती सुटली तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. मुंबई सेंट्रलपर्यंत सवयीच्या गतीने आलेली ही गाडी नंतर अचानक थंडावली, आणि पुन्हा परतीच्या प्रवाशांचे चेहरे भयाने काळवंडले. खिडकीतून बाहेरच्या अंधारावर नजरा खिळल्या, आणि आपली गाडी गुडघाभर पाण्यात बुडालेल्या रुळांवरून सावधपणे मार्ग काढत सरकते आहे, हे लक्षात येताच, रेल्वेच्या कार्यक्षमतेला सलाम केला, आणि डब्याडब्यात गणपती बाप्पाचा गजर झाला.. आशेचे किरण अधिक चमकदार झाले, आणि पुन्हा एकदा, ‘मुंबई स्पिरिट’च्या अनुभवाने नवखे मुंबईकर भारावून गेले!