एरव्ही ‘बेस्ट’ची बस बंद पडली तरी प्रवासी ढुंकूनही बघत नाहीत. वाहकाने धक्का मारण्याची विनंती केली तरीही फार कमी प्रवासी मदतीला येतात. पण मंगळवारी चित्र काहीच वेगळेच होते. अतिवृष्टीने उपनगरीय रेल्वे सेवा कोलमडली. शीवहून ठाणे, कल्याण, डोंबिवली वा नवी मुंबईकडे जाण्यासाठी ‘बेस्ट’ बसगाडय़ा हा एकवेम आधार होता. ‘बेस्ट’ने मग ठाण्याकडे जाणाऱ्या सी-४२ क्रमांकाच्या बसची संख्या वाढविली. राणी लक्ष्मीबाई चौकातून बसगाडय़ा सुटतात तेथे प्रवाशांची भली मोठी रांग लागली. बसेस, चालक आणि वाहक यांचे गणित जुळविताना नियंत्रकाला तारेवरची कसरत करावी लागत होती. कोपऱ्यात एक बस उभी होती, पण तिचा आरसा तुटलेला होता. त्यामुळे चालकाने बस चालविण्यास असमर्थता व्यक्त केली. दुरुस्ती पथकातील एक कर्मचारी आरसा बसविण्यासाठी आला. तेव्हा धो धो पाऊस पडत होता. रांगेतील प्रवासी मग दुरुस्ती कर्मचाऱ्याच्या मदतीला धावून गेले. एकाने जवळच्या दुकानातून स्टूल आणून त्यावर उभे राहात आरसा बसविण्यासाठी मदत केली. १० ते १५ मिनिटांत आरसा बसविण्यात आला. दुरुस्ती पथकातील कर्मचाऱ्याने बस चालविण्यास योग्य असल्याचा नियंत्रकाजवळ निर्वाळा दिला आणि बस प्रवाशांना घेऊन ठाण्याकडे रवाना झाली.

देवदूत

छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाकडे जाताना कुल्र्यापासून शीवपर्यंत रेल्वे मार्गाच्या पसरलेल्या झोपडय़ांकडे बघून प्रवासी एरव्ही नाके मुरडतात. किती घाण, असा सवाल केला जातो. पण या झोपडपट्टीतील रहिवासीच मंगळवारी कुर्ला ते शीवपर्यंत रेल्वे गाडय़ांमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी देवदूत ठरले. साधारणपणे दुपारी दोननंतर कुल्र्यापासून रेल्वेसेवा ठप्प झाली. सुमारे दोन तास प्रवाशांनी कळ काढली, मग रेल्वेमार्गातून पायपीट सुरू झाली. तेव्हा पाणीही थोडे कमी होते. साडेतीननंतर पुन्हा पावसाने जोर पकडला आणि नेमकी तेव्हाच भरतीची वेळ असल्याने रेल्वे मार्गातील पाण्याची पातळी वाढली. हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेससह आठ ते दहा उपनगरीय गाडय़ांमधील प्रवासी अडकले होते. जसजसा कोळाख पडू लागला तसतसा प्रवाशांचा धीर सुटू लागला. पाण्याची पातळी वाढलेली असल्याने खाली उतरून रेल्वे मार्गातून चालणेही जिकिरीचे होते. रेल्वे गाडय़ांमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी मग आसपासच्या झोपडय़ांमधील तरुण मदतीला आले. हातात काठय़ा किंवा बाबू घेऊन प्रवाशांना शीव स्थानकात नेण्यास मदत केली. हैदराबाद गाडीतील प्रवाशांना याच तरुणांनी साखळी करून उतरविले. त्यांचे सामान उचलण्याकरिता या तरुणांनी मदत केली. शीव स्थानकाजवळ रेल्वे मार्गात एक गटार आहे. त्यात पाय जाण्याची भीती होती. प्रवाशांच्या मदतीला धावून आलेल्या तरुणांनी मग त्या खड्डय़ाच्या भोवताली साखळी केली होती. सर्व प्रवाशांचा हात धरून त्यांना खड्डा पार करण्याकरिता मदत करीत होते. उपनगरीय गाडय़ांमधील महिला प्रवाशांनी गाडीतच बसणे पसंत केले. मग त्यांच्यासाठी पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटांचे पुडे वाटण्यात आले. महिला प्रवाशांना खाली उतरता यावे म्हणून स्थानिक  तरुणांनी शिडी आणली होती. सहानंतर रेल्वे गाडय़ांमधील लाइटही बंद पडले. काळोखात महिला प्रवाशांनी गाडीतच थांबणे धोक्याचे असल्याने पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने महिला प्रवाशांना खाली उतरवून सुरक्षितपणे शीव स्थानकात नेले. झोपडपट्टीतील तरुण आमच्यासाठी देवदूत ठरले, ही एका महिला प्रवाशाची प्रतिक्रिया मार्मिक होती. शीव स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी सामाजिक संस्थेकडून केळ्यांचे वाटप करण्यात आले.