ओरिसापासून गुजरातपर्यंत सरकत आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवातसदृश स्थितीत रूपांतर झाल्याने मंगळवारी मुंबईत अतिवृष्टी झाली. यावेळी मुंबईच्या आकाशात सहा ते आठ किलोमीटर उंचीचे ढग होते. मात्र पावसाळ्यात एवढय़ा उंचीचे ढग अगदीच सामान्य असून पावसाळ्याच्या पूर्वार्धात किंवा उत्तरार्धात कधीकधी ढगांची उंची १२ ते १४ किलोमीटपर्यंतही पोहोचते. २६ जुल २००५ रोजी ढगांची उंची १७ किलोमीटपर्यंत पोहोचली होती, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

२६ जुलैनंतरच्या सर्वात मुसळधार पावसाने मंगळवारी मुंबईला झोडपले. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतच्या नऊ तासांमध्ये २९७ मिमी पाऊस पडला. यातील १७१ मिमी पाऊस हा दुपारी अडीच ते संध्याकाळी साडेपाच या भरतीच्या वेळी पडला. या पावसासाठी दक्षिण गुजरातजवळ निर्माण झालेली चक्रीवातसदृश स्थिती कारणीभूत ठरली. पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा आणि गुजरातच्या दक्षिणेचे कमी क्षेत्र हे अनेकदा उत्तर कोकणात (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड) भरपूर पाऊस देते. ही स्थिती अचानक निर्माण झाली नव्हती. यावेळी पूर्व किनारपट्टीजवळ ओरिसावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. हे क्षेत्र वायव्येकडे सरकत आले. त्यामुळे आधी विदर्भात व त्यानंतर मध्य प्रदेशमध्येही जोरदार पाऊस पडला. चौथ्या दिवशी या कमी दाबाच्या क्षेत्राचे दक्षिण गुजरातजवळ चक्रीवातसदृश तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले. त्याआधी सोमवारीही मुंबईसह उत्तर कोकणात जोरदार पाऊस झाला, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मंगळवारीही याच पावसाची पुनरावृत्ती झाली. मात्र ही ढगफुटी नव्हती. शहरावर सहा ते आठ किलोमीटर उंचीचे ढग होते. असे ढग पावसाळ्यात सर्वसामान्य असून ते फुटण्याची शक्यता नसते. मात्र हवामानातील इतर घटकांचा अभ्यास करून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. गुजरातमध्ये कोणतेही चक्रीवादळ नाही. तिथे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाले आहे. पावसाळ्यात  अशी हवामानस्थिती दुर्मीळ नाही व त्यामुळे उत्तर कोकणात भरपूर पाऊस पडतो, असे होसाळीकर यांनी स्पष्ट केले.

२६ जुलै २००५ शी तुलना

अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा, दक्षिण गुजरातवरील चक्रीवातसदृश स्थिती यासोबतच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ही स्थिती २६ जुलैच्या प्रलयावेळी होती. मात्र  त्यावेळी ढगांचे केंद्रीकरण होऊन त्यांची उंची तब्बल १६ ते १७ किलोमीटपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडला होता व सांताक्रूझ येथे तब्बल ९४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. दोन वर्षांपूर्वी १९ जून २०१५ रोजी हवामानाची हीच स्थिती होती. मात्र ढगांची उंची सहा ते सात किलोमीटर होती. त्यावेळी ३६ तासांमध्ये ३०० मिमीहून अधिक पाऊस पडला होता. २९ ऑगस्ट रोजी गुजरातच्या दक्षिणेकडील चक्रीवातसदृश स्थिती अधिक कारणीभूत ठरली. यावेळी ढगांची उंची सहा ते आठ किलोमीटर एवढी होती.

ढगफुटी म्हणजे काय?

ढगफुटी म्हणजे प्रचंड वारे आणि विजांसह अतिवेगाने कोसळणारा (तासाभरात १०० मिमी) पाऊस असतो. ढगफुटी घडवून आणणारा ढग हा १५ किलोमीटर उंचीपर्यंतचा असू शकतो. या उंचचउंच ढगामधून कमी वेगाने पडणारे लहान थेंब अचानक एकत्र येऊन त्यापासून मोठ्या आकाराचे वेगाने खाली येणारे थेंब तयार होतात. अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरावरून येणारे मान्सूनचे ढग पठारावरून सरकत, हिमालयाच्या डोंगररागांमध्ये गोळा होतात. त्यांची उंची वाढत जाते आणि अचानक प्रचंड पाऊस पडतो. साधारणत पश्चिम हिमालयाच्या क्षेत्रात पावसाळ्यात ढगफुटीच्या घटना घडतात. डोंगराळ भाग अधिक असल्याने ईशान्य भारतात तसेच पश्चिम घाटातही ढगफुटी होते. पठारी प्रदेशावरही ढगफुटी होऊ शकते, मात्र त्याची शक्यता फारच कमी आहे.